श्री गणेश मूर्तीतून इतिहास संवर्धनाचा अनोखा संदेश : जमिनीखाली गाडली गेलेली वीरगळ बाहेर काढताना बाप्पा

कोल्हापूर :

कसबा बीड ता. करवीर येथील चॅलेंज ग्रुपने श्री गणेश मूर्तीतून इतिहास संवर्धनाचा अनोखा संदेश दिला आहे. कसबा बीड गावी इतिहासाच्या खुणा पावलोपावली दिसतात. या इतिहासाचे संवर्धन व्हावे या दृष्टीने जमिनीखाली गाडली गेलेली वीरगळ बाहेर काढतानाच्या श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून गणेशोत्सवातून इतिहास संवर्धनाचा संदेश देत ग्रामस्थांमध्ये इतिहास प्रेम वाढीस लावण्याचा प्रयत्न केला आहे.

तसेच गावातील लोकांना आपल्या इतिहासाची नव्यानं ओळख व्हावी यासाठी श्री ज्ञानेश्वर मंडप येथे चॅलेंज ग्रुप आणि यंग ब्रिगेड सुवर्ण राजधानी कसबा बीड यांच्या संयुक्त विद्यमाने इतिहास प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले होते.

या प्रदर्शनात गावातील वीरगळ, सतिगळ, शिलालेख, दगडी प्रापंचिक साहित्य, मातीची भांडी, खापरे अशा प्रकारचे महत्वाचे पुरावशेष या प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. तसेच गावाच्या इतिहासाची माहिती देणारे फलक लावण्यात आले होते. यात तीरवाड बीड चे कसबा बीड कसे झाले, शिलाहारांचे आणि कसबा बीडचे नाते काय, कसबा बीड हे गाव राजधानी होते की लष्करी ठाणे, या गावातील विविध मंदिरे, कसबा बीडला वीरगळ कारखाना का म्हणतात, कसबा बीड मध्ये आढळणारे शिलालेख काय सांगतात, या गावात खरंच सोन्याचा पाऊस पडतो का आणि आज ह्या एकविसाव्या शतकात कसबा बीडचे महत्त्व काय अशा प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न ह्या प्रदर्शनातून करण्यात आला.

गावात सापडणाऱ्या सुवर्ण मुद्रांची चित्रे येथे प्रदर्शित करण्यात आली होती. ह्या प्रदर्शनास ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद लाभला. जवळपास ४०० लोकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. विशेष म्हणजे यात महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती.

सदर प्रदर्शनासाठी राजाराम वरुटे, हळदकर, युवराज कांबळे, राहुल जाधव, विद्यामंदिर कसबा बीड, श्री. कल्लेश्र्वर हायस्कूल कसबा बीड, तलाठी कार्यालय कसबा बीड, श्री बीडेश्र्वर महादेव मंदिर व्यवस्थापन इत्यादींचे सहकार्य लाभले. यंग ब्रिगेड सुवर्ण राजधानी कसबा बीड यांची संकल्पना, मूर्तिकार ओंकार कुंभार (बलिंगा) यांची कला, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश तिबीले यांचे प्रोत्साहन आणि चॅलेंज ग्रुपचे पाठबळ यामुळे ही संकल्पना यशस्वी राबविणे शक्य झाले आहे. ही गणेश मूर्ती पाहण्यास ग्रामस्थांसह इतिहासप्रेमीचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.


मातीत गाडली गेलेली, विस्मृतीत गेलेली वीरगळ श्री गणेश मातीतून बाहेर काढत आहेत आणि ते लोकांना दाखवतायत अशा स्वरूपातील गणेश मूर्ती यावर्षी चॅलेंज ग्रुप मामाची तिकटी कसबा बीड येथे विराजमान झाली. गणेश उत्सवातून समाज प्रबोधनाचा उद्देश चॅलेंज ग्रुप आपल्या ह्या गणेश मुर्ती आणि देखाव्यातून साध्य करतोय. कसबा बीडला हजारो वर्षांचा इतिहास, संस्कृती लाभली आहे. पण काळानुरूप आज ती विस्मृतीत गेली आहे. ह्या संस्कृतीची नव्यानं ओळख लोकांना व्हावी, याच्या रक्षणाची जाणीव गावकऱ्यांत निर्माण व्हावी यासाठी ही गणेश मूर्ती खास बनवून घेण्यात आली आहे.
— सूरज तिबिले, यंग ब्रिगेड सुवर्ण राजधानी कसबा बीड.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!