राणी मगदूम यांच्या निधनानंतर अवयव दान, मगदूम कुटुंबीयांचा सामाजिक बांधिलकी जोपासत आदर्श निर्णय
कोल्हापूर :
सांगरूळ ता करवीर येथील राणी विलास मगदूम यांना डॉक्टरनी ब्रेन डेड घोषित केले, यानंतर मगदूम कुटुंबियांनी त्यांचे अवयव दान करून सामाजिक बांधिलकी जोपासत समाजापुढे आदर्श ठेवला आहे, त्यांच्या अवयवदान मुळे तीन रुग्णांना जीवदान मिळाले आहे.
राणी विलास मगदूम ( वय ४० ) यांना सोमवार २९ ऑगस्ट रोजी किरकोळ अस्वस्थ वाटू लागल्यामुळे घरच्यांनी त्यांना गावातील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले होते . तिथे उपचार सुरू असताना हृदय विकाराचा धक्का बसल्याने तेथील डॉक्टरनी त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूरला दाखल करण्यास सांगितले .
कोल्हापूरात खाजगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जात असताना वाटतच त्या बेशुद्ध झाल्या . कोल्हापूरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते . मंगळवार ३० रोजी रात्री डॉक्टरनी त्यांना ब्रेन डेड म्हणून घोषित केले.
घरातील एकमेव करत्या सावरत्या स्त्रीचे निधन झाल्याने दुःखाचा डोंगर कोसळलेल्या मगदूम कुटुंबीयांनी दुःखातून सावरून सामाजिक बांधिलकी जपत राणी मगदूम यांचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला .
सांगरुळ परिसरातील हा पहिलाच उपक्रम आहे . कोल्हापूरच्या डायमंड हॉस्पिटलमध्ये दोन किडनी , यकृत दान करण्यात आले .ग्रीन कॉरिडॉनच्या मार्फत एक किडनी पुण्याच्या रुबी हॉस्पिटल मधील रुग्णाला, तर एक किडनी डायमंड हॉस्पिटलमधील रुग्णाला तसेच यकृत सोलापूर येथील हॉस्पिटल मधील एका रुग्णाला दान करण्यात आले . यामुळे तीन रुग्णांना जीवदान मिळाले .
राणी मगदूम शरीराने गेल्या असल्या तरी त्यांचे पती विलास मगदूम यांच्या मोठ्या धाडसी निर्णयामुळे अवयव दान करून अनेकांना जीवदान देऊन गेल्या आणि अवयव रुपाने त्यांच्या स्मृती जिवंत राहिल्या आहेत . त्यांच्या पश्चात पती, मुलगी, मुलगा असा परिवार आहे.