सामाजिक : या 34 ग्रामपंचायत
विधवा प्रथा बंदी ठराव करणार
दक्षिण विधानसभा मतदारसंघातील
आमदार ऋतुराज पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीत निर्णय,
३१ मे पूर्वी मासिक सभा, ६ जूनला ग्रामसभेत घेणार मंजुरी
कोल्हापूर :
कोल्हापुर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व 34 ग्रामपंचायतीनी विधवा प्रथा बंदीचा ठराव करण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार ऋतुराज पाटील यांनी आयोजित केलेल्या दक्षिण मतदारसंघातील सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी , ग्रामसेवक यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आमदार पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत दक्षिण मतदार संघातील 34 ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी 31 मे पूर्वी विशेष मासिक सभेत याबाबतचा ठराव घेण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर यासाठी ६ जून रोजी विशेष ग्रामसभाही होणार आहे. मतदार संघातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये विधवा प्रथा बंदीचा ठराव करून कोल्हापूर दक्षिण मतदार संघ राज्यात वेगळा आदर्श घालून देणारा मतदारसंघ ठरणार आहे.
या बैठकीत आमदार ऋतुराज पाटील यांनी राज्यात सर्वप्रथम विधवा प्रथा बंदीचा ठराव करणाऱ्या हेरवाड ग्रामपंचायतीचे अभिनंदन केले. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांची कास धरून विकासाची वाटचाल करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड गावाने ‘विधवा प्रथा बंदी’चा ठराव करून शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा आपल्या कृतीतून जपला आहे. हेरवाड ग्रामपंचायतीचा आदर्श घेऊन माझ्या कोल्हापूर दक्षिण मतदासंघातील ग्रामपंचायतींनी सुद्धा असा निर्णय घेऊन राज्यासमोर आणि देशासमोर एक आदर्श घालून द्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत दक्षिण मतदारसंघातील सर्व ३४ पदाधिकाऱ्यांनी ‘विधवा प्रथा बंदी'चा ठराव करण्याचा निर्णय घेतला.
३१ मे पर्यंत विशेष मासिक सभा घेऊन त्यात ‘विधवा प्रथा बंदी’चा ठराव, पंचगंगा नदी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी निर्माल्य दान, मूर्ती दान उपक्रम राबविणे, शाळेच्या १०० मी. आवारांमध्ये तंबाखुजन्य पदार्थ विक्री किंवा सेवन होणार नाही याची कटाक्षाने काळजी घेणे, बाल विवाह रोखणे हे चार महत्वपूर्ण ठराव मांडले जाणार आहेत. येत्या ६ जूनला शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या निमित्ताने या सर्व ग्रामपंचायती मार्फत फक्त सामाजिक प्रश्नांसाठी विशेष ग्रामसभा घेऊन हे सर्व ठराव मंजूर केले जाणार आहेत.
या बैठकीमध्ये सन 2019 आणि 2021 साली जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीचा अनुभव लक्षात घेता पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या अडचणी आणि त्यावर करावयाच्या उपाययोजनांबाबत सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी दिल्या. नागरिकांना वेळेत मदत उपलब्ध करुन देणे, नागरिक व जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणे, धान्य वाटप आदी बाबींचे काटेकोर नियोजन करावे. तसेच ओढे नाल्यांची पावसाळ्यापूर्वी स्वच्छता करून घ्यावी जेणेकरून पावसाळ्यात पाण्याचा निचरा लवकर होऊन नागरी वस्तीत पाणी शिरणार नाही, अशा सूचना त्यानी दिल्या.
पालकमंत्री ना. सतेज पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन पूरपरिस्थिती उद्भवू नये, यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करत आहे. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत ‘पब्लिक ॲड्रेस सिस्टीम’चा प्रभावीपणे वापर करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचेही आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी सांगितले.
प्रशासनाच्यावतीने करवीरचे गटविकास अधिकारी जयवंत उगले यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना पूर बाधित क्षेत्रातील कुटुंबांची अद्यावत माहिती संकलित करून ती प्रशासनाला कळवावी असे आवाहन केले. या महितीमुळे पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्या त्यावर करावयाचा उपाययोजना याची प्रशासनाला तयारी करता येणार आहे. प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन उगले यांनी केले.