Tim@Global
पुणे :
मागील आठवडय़ात बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाले होते. परिणामी राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरणासह वाऱ्याचा वेग वाढल्याने कमाल तापामानात किंचित घट झाली होती.
राज्यातील वाऱ्यांचा वेग मंदावल्याने पुन्हा एकदा तापमानाचा पारा चांगलाच वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. सोमवारपासून (२८ मार्च) राज्यभरातील वातावरण कोरडे होणार असून उष्णतेची लाट आणखी तीव्र होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यभरातील बहुतांश शहरांमधील कमाल सरासरी तापमान ४० ते ४१ अंशांवर जाणार असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, शनिवारी २६ मार्च एकच दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अंशत: ढगाळ वातावरण आणि काही भागांत हलक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. तर, कोकणात काही ठिकाणी व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.
सोमवारपासून आणखी काहिलीचा अंदाज….
तापभान.. २८ मार्चपासून उत्तर भारतात राजस्थानपासून पुन्हा उष्ण लहरी सक्रिय होत आहेत. त्याचा परिणाम म्हणून उत्तर भारतासह महाराष्ट्रही तापणार आहे. राज्यात विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात प्रामुख्याने कमाल तापमानात चार ते पाच अंशांनी वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
सद्य:स्थिती.. मुंबई ३२.५-२३.८, रत्नागिरी ३२.५-२५.३, पुणे ३७.८-२३.४, जळगाव ४०.२-१९.७, कोल्हापूर ३८.८-२४, महाबळेश्वर २८.८-१९ , नाशिक ३७.२-१९.८, सांगली ३६.४-२३.६, सातारा ३७.१-२४, सोलापूर ४०.५-२४.२, औरंगाबाद ३८.४-२२.१, परभणी ३९-२६, नांदेड ३९-२५.२ आणि अकोला ४२-२६ (सर्वाधिक)