घरगुती गॅस सिलेंडर महागल्याने सर्वसामान्यांच कंबरडं मोडलं
Tim Global :
LPG Price Hike: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली, वाढीचे परिणाम आता दिसू लागले आहेत. यामुळे सर्वसामान्यांना चारही बाजूने महागाईचा फटका बसत आहे, आता घरगुती गॅस सिलेंडर महागला आहे. पेट्रोल आणि डिझेलमध्ये ८० पैशांची वाढ करण्यात आली आहे.
एलपीजी ५० रुपयांनी महागला…..
१४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलेंडरचा दर ५० रुपयांनी वाढवण्यात आला आहे. अनेक महिन्यांनी एलपीजी सिलेंडरचा दर वाढवण्यात आला आहे. याआधी ६ ऑक्टोबर २०१९ ला हा दर वाढवण्यात आला होता. दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलेंडरसाठी ९४९ रुपये ५ पैसे मोजावे लागत आहेत. याआधी ८९९ रुपये ५० पैसे मोजावे लागत होते.
पेट्रोल आणि डिझेलही महागलं….
देशात गेल्या अनेक महिन्यांपासून स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अखेर वाढ झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत ८० पैशांची वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल ८४ तर डिझेल ८३ पैशांनी महागलं आहे. राजधानी दिल्लीमध्ये आज म्हणजेच २२ मार्च २०२२ ला पेट्रोलचा दर ९५ रुपये ४१ पैशांवरुन वाढत प्रतिलीटर ९६ रुपये २१ पैसे झाला आहे. तर डिझेलचा दर ८६ रुपये ६७ पैशांवरुन ८७ रुपये ४७ पैशांवर पोहोचला आहे.
देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत आज पेट्रोलचा दर १०९ रुपये ९८ पैशांवरुन वाढून प्रतीलिटर ११० रुपये ८२ पैसे झाला आहे. तर डिझेलचा दर ९५ रुपयांवर पोहोचला आहे. हा दर गेल्या चार महिन्यांपासून ९४ रुपये १४ पैसे होता.