सावर्डे दुमाला येथे शिवजयंतीनिमित्त पालखी सोहळा, शिवजन्मोत्सव पाळणा उत्साहात
करवीर :
सावर्डे दुमाला (ता. करवीर) येथील संयुक्त शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने दरवर्षी डॉल्बीविरहित विधायक शिवजयंती मोठ्या दिमाखात साजरी केली जाते. यावर्षी शिवजयंतीनिमित्त
पालखी सोहळा, शिवजन्मोत्सव पाळणा यासह आयोजित विविध कार्यक्रमास ग्रामस्थ, महिला, युवकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. युवकांसह महिला व युवतींचा सहभागी उल्लेखनीय असतो.
१८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता गावातील शिव छावा मर्दानी खेळातील मुलींच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयासमोरील कार्यक्रमस्थळी शिवरायांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता शिवज्योत आगमन झाल्यावर शासकीय नियमांचे पालन करत शिव पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या पालखी सोहळ्यात लहानापासून मोठ्यापर्यंत अनेक युवकांनी, मुलींनी पारंपरिक वेशभूषा परिधान केला होता. छत्रपती शिवाजी महाराज की जय चा जयघोष घुमत होता. त्यानंतर महिला शिवजयंती उत्सवातील शिव जन्मोत्सव पाळणा हा एक महत्त्वाचा कार्यक्रम. या कार्यक्रमास गावातील महिला, महाविद्यालयीन युवती व शालेय मुली यांनी सहभागी होत शिवरायांची पाळणा गीते सादर केली.
सायंकाळी स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, शिवरायांचा मावळा आदी विषयावर लहान गट, मोठा गटा साठी वक्तृत्व स्पर्धा पार पडल्या. विजेत्यांचा रोख बक्षिसे, प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.