लढताना अधिक सोयीस्कर, आरामदायक, वातावरणाला अनुकूल आणि वेगळी रचना असलेला नवा गणवेश भारतीय लष्कराने जारी केला
दिल्ली :
लढताना अधिक सोयीस्कर, आरामदायक, वातावरणाला अनुकूल आणि वेगळी रचना असलेला नवा गणवेश भारतीय लष्कराने जारी केला ,नवा गणवेश परिधान केलेल्या पॅराशूट रेजिमेंटच्या कमांडोंच्या एका पथकाने येथील करिअप्पा मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या लष्कर दिवस कवायतीत भाग घेतला.
ऑलिव्ह, मातकट रंगांसह अनेक रंगांचे मिश्रण असलेला हा गणवेश फौजांच्या तैनातीचा परिसर, तसेच ते ज्या वातावरणात कर्तव्य बजावतात ती परिस्थिती यांसारखे पैलू विचारात घेऊन तयार करण्यात आला आहे
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेच्या सहकार्याने विविध देशांच्या लष्करी गणवेशांचे विश्लेषण करून नव्या गणवेशाची रचना केली आहे. आरामदायक असलेला हा गणवेश सर्व प्रकारच्या भूप्रदेशांत वापरता येईल.
संगणकाच्या मदतीने त्याचा ‘डिजिटल डिस्राप्टिव्ह पॅटर्न’ तयार करण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सीमांबाबत दक्ष- लष्करप्रमुख नरवणे ….
देशाच्या सीमांवरील परिस्थिती एकतर्फी बदलण्याचा आम्ही कुणालाही प्रयत्न करू देणार नाही, असे प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी शनिवारी लष्कर दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
पूर्व लडाखमधील तिढ्याचा संदर्भ देऊन लष्करप्रमुख म्हणाले की, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी भारत व चीन यांच्यात लष्करी चर्चेची चौदावी फेरी नुकतीच पार पडली. परस्पर आणि समान सुरक्षेच्या आधारावर सध्याच्या परिस्थितीवर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरूच राहतील. ‘आमचा संयम हे आमच्या आत्मविश्वासाचे लक्षण आहे; मात्र कुणीही त्याची परीक्षा घेण्याची चूक करू नये.