राज्यातील ६५० केंद्रांवर सुमारे साठ लाख मुलांचे लसीकरण
मुंबई :
करोनाच्या ओमायक्रॉन या विषाणूचा वेगाने प्रसार सुरू असून या पार्श्वभूमीवर देशात १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण आजपासून सुरू होत आहे. मुलांच्या लसीकरणासाठी कोव्हॅक्सिन ही लस वापरण्यात येणार असून, राज्यातील ६५० केंद्रांवर सुमारे साठ लाख मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
मुलांच्या लसीकरणासाठी कोविन संकेतस्थळावर नावनोंदणी शनिवारपासून (१ जानेवारी) सुरू करण्यात आली आहे. तसेच प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर नाव नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. २००७ मध्ये किंवा त्यापूर्वी जन्मलेली सर्व मुले करोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी पात्र आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.
राज्यात १५-१८ वर्ष वयोगटातील सुमारे साठ लाखांवर मुले करोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी पात्र आहेत. राज्यभरातील ६५० केंद्रांवर या वयोगटाचे लसीकरण होणार आहे. लहान मुलांच्या लसीकरणासाठी केवळ कोव्हॅक्सिन लशीच्या वापराला परवानगी असल्याने मुलांसाठीच्या लसीकरण केंद्रांवर केवळ कोव्हॅक्सिन लसच उपलब्ध असेल याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करणे शक्य नसलेल्या ठिकाणी लसीकरण केंद्रांवर मुलांच्या लसीकरणासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी असेही सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना कळवल्याचे डॉ. देसाई यांनी स्पष्ट केले.
‘लशीची भीती नको….
कोव्हॅक्सिन ही सर्वात सुरक्षित लस असल्याने पालकांनी अजिबात घाबरून न जाता मुलांचे लसीकरण करावे, असा सल्ला ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. शरद आगरखेडकर यांनी दिला़ लस टोचल्यानंतर टोचलेली जागा लाल होणे, दुखणे किंवा ताप येणे हे सर्वसामान्य परिणाम दिसल्यास घाबरून जाऊ नये. अर्धा तास लसीकरण केंद्रावर थांबावे. त्यानंतर घरी जावे. मात्र, मुलांना लस देण्याबाबत टाळाटाळ किंवा दिरंगाई करू नये, असेही डॉ. आगरखेडकर यांनी स्पष्ट केले.
महाविद्यालयांबाबत दोन दिवसांत निर्णय
मुंबई : राज्यात करोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर कुलगुरूंबरोबर बैठक झाली आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करून महाविद्यालये सुरू ठेवण्याबाबत पुढील निर्णय दोन दिवसांत घेण्यात येईल, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रविवारी सांगितले.
रुग्णवाढ अशी..
२८ डिसेंबर : २,१७२
२९ डिसेंबर : ३९००
३० डिसेंबर : ५,३६८
३१ डिसेंबर : ८०६७
१ जानेवारी : ९,१७०
२ जानेवारी : १२ हजार