31 डिसेंबर व नववर्षाच्या पार्श्वभुमीवर मार्गदर्शक सूचना
कोल्हापूर :
ओमिक्रॉन विषाणूचे संक्रमण सामान्य
नागरीकांमध्ये/ रहिवाशांमध्ये फार मोठया तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता
आहे. या पार्श्वभुमीवर नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणून
मोठया प्रमाणात एकत्र न येता या वर्षी 31 डिसेंबर 2021 (वर्षअखेर) व नुतन
वर्ष 2022 चे स्वागत अत्यंत साधेपणाने साजरे करण्यासाठी जिल्हादंडाधिकारी
तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी
मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत.
या अनुषंगाने खालील प्रमाणे सुचना देण्यात आलेल्या आहेत :-
1) कोरोनाच्या अनुषंगाने दि. 31 डिसेंबर 2021 रोजी व दिनांक 1 जानेवारी
2022 रोजी नववर्ष स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता
नववर्षाचे स्वागत शक्यतोवर घरीच साधेपणाने साजरे करावे.
2)मदत व पुनर्वसन विभाग,मंत्रालय,मुंबई यांच्या उपरोक्त दि.24/12/2021
रोजीच्या आदेशान्वये राज्यात दि.25 डिसेंबर,2021 पासून रात्री 9.00 ते
सकाळी 6.00 वाजपर्यंत 5 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यावर बंदी
घालण्यात आली आहे, या आदेशांचे पालन करण्यात यावे.
3) कोविड-19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र शासन
महसुल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे परिपत्रक
क्र.DMU/2020/CR92/Dis-1, दिनांक 27/11/2021 अन्वये सुधारित मार्गदर्शन
सुचनांचे तंतोतंत पालन करावे. तसेच शासन आदेश मदत व पुनर्वसन विभागाचे
परिपत्रक क्र.DMU/2020/CR92/Dis-1, दिनांक 24 डिसेंबर 2021 अन्वये
देण्यात आलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे.
4) 31 डिसेंबर 2021 व नूतन वर्ष 2022 च्या स्वागताकरीता आयोजित करण्यात
आलेल्या कार्यक्रमांना बंदिस्त सभागृहात उपलब्ध आसन क्षमतेच्या 50 टक्के
पर्यंत तर खुल्या जागेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना उपलब्ध
क्षमतेच्या 25 टक्केच्या मर्यादित उपस्थित राहण्यास परवानगी असेल.
5) या ठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सोशल डिस्टन्सिंग
राखले जाईल तसेच मास्क् व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे
आवश्यक, तसेच त्या ठिकाणी निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी.
6) कोरोनाच्या पार्श्वभुमीवर 60 वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षाखालील
मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतोवर घराबाहेर जाणे
टाळावे.
7) 31 डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी समुद्र किनारी, बागेत, रस्त्यावर अशा
सार्वजनिक ठिकाणी मोठया संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टंन्सिंग
(सामाजिक अंतर) राहील तसेच मास्क व सॅनिटाझरचा वापर होईल याकडे विशेष
लक्ष देणे आवश्यक आहे.
8) नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे
धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करु नये तसेच मिरवणुका काढण्यात
येऊ नयेत.
9) नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात
असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टंन्सिंगचे
पालन करावे. तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून
योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात.
10) फटाक्यांची आतीषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनी
प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.
11) कोवीड-19 व विशेषत्वाने ओमिक्रॉन या विषाणुचा
प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नगर विकास विभाग, मदत व पुनर्वसन,
आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच इकडील कार्यालयाकडून,
महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे
अनुपालन करणे बंधनकारक राहील.
12) तसेच या परिपत्रकानंतर व 31 डिसेंबर 2021 व नुतन वर्ष
2022 सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सुचना प्रसिध्द झाल्यास
त्यांचे देखील अनुपालन करावे.
तरी 31 डिसेंबर,2021 व नुतन वर्ष 2022 साजरा करतेवेळी उपरोक्त
सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्या बाबत आपले अधिनस्त सर्व
संबंधितांना आपल्या स्तरावरुन सुचना देणेत याव्यात.