गवा संग्रहीत छायाचित्र
करवीर :
करवीर तालुक्यात वाकरे, कोगे ,सांगरुळ, पाडळी बु, या अनेक भागात गवे येण्याचे प्रमाण वाढले आहे .शेतकऱ्यांनी गवे आल्यास खबरदारी घ्यावी असे आवाहन वन खात्यातर्फे करण्यात आले आहे.
याबाबत बोलताना करवीर तालुक्याच्या वन विभागातील वनरक्षक कोमल रहाटे म्हणाल्या, गव्याची चरण्याची वेळ ही सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर असते हे लक्षात घेऊन बाहेर पडण्याचे शेतकऱ्यांनी नियोजन करावे. गवा मुळातच भित्रा वन्यप्राणी आहे. गवा आपणहून हल्ला करत नाही, गवा मानवी वस्तीजवळ आला तर त्याला बघण्याच्या हेतूने लोक एकत्र जमतात. गोंगाटाने आरडाओरडा केल्यामुळे गवा बिथरून हल्ला करण्याची शक्यता असते, आणि यामुळे गव्याच्या वाटेत आडवे येऊ नये. आजूबाजूला जर गव्यांचा कळप दिसून आला तर त्यांच्यापासून लांब राहून, त्यांना हुसकावून लावावे, पण त्यांच्या पाठीमागे लागू नये, अशावेळी आत्मरक्षणासाठी गवे मागे वळून हल्ला करू शकतात. गव्याने पाठलाग केल्यास पायवाट सोडून झाडा-झुडुपात अथवा शेतात पळावे आणि गव्यांचा कळप तिथून निघून जाईपर्यंत या जागेत शांतता राखावी, मोबाईल वर फोटो आणि सेल्फी घेऊन नये आणि व्हाट्सअप, फेसबुक वर पाठवू नये कारण यामुळे तिथे गर्दी वाढून परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते .
शेतातल्या विहिरीकडे कठडे बांधून बंदिस्त करावेत , जेणेकरून गवे पाण्याच्या शोधात येऊन विहिरीत पडणार नाहीत. जंगलातील कुरणे आणि बांबू वनस्पती गव्यांचे नैसर्गिक खाद्य आहे, त्यावर पाळीव जनावरे सोडू नयेत, तसेच गवताळ कुरणांना आग लावू नये, आग लावलेने गवत तसेच झाडे नष्ट होऊन जंगलातील गव्यांचे नैसर्गिक खाद्य संपते, व गवे नवीन खाद्य शोधण्यासाठी शेतात किंवा गावात वस्तीमध्ये येतात.
तसेच शेतात पाणी सोडायला जायचे असल्यास अजून एखादी व्यक्ती सोबत असावी , हातामध्ये संरक्षणार्थ काठी असावी, तसेच मोबाईलवर गाणी ऐकत गेल्यास आजुबाजूच्या दिशेने कोणताही वन्यप्राणी येणार नाहीत.
गव्यांचा कळप गावात किंवा शेतात आल्यास स्थानिक वन विभागास कळवावे, अशी माहिती वन विभाग कोल्हापूर यांचेतर्फे जनहितार्थ देण्यात आली आहे.