घ्या पिकस्पर्धेत भाग : 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करावेत

कोल्हापूर :

शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती करणे व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य, जिल्हा, विभाग व तालुका पातळीवर पिकस्पर्धांचे आयोजन करण्यासाठी कार्यपध्दतीमध्ये सुधारणा केली आहे. रब्बी हंगाम 2021 साठीच्या पीकस्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी दिनांक 31 डिसेंबर 2021 रोजी पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे.

रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस, तीळ या पिकांचा रब्बी हंगाम पीकस्पर्धेमध्ये समावेश करण्यात आला आहे. पिकस्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे संबंधित पिकाखालील किमान १० आर. (०.१० हेक्टर) सलग क्षेत्रावर लागवड असणे आवश्यक आहे.

पिकस्पर्धेसाठी तालुका हा घटक निश्चित केला असून ज्या पिकाखालील संबंधित तालुक्यातील एकूण लागवड क्षेत्र 1 हजार हेक्टर किंवा त्याहून अधिक आहे, अशा पिकांकरीता पिकस्पर्धा आयोजित केली जाणार आहे. ही स्पर्धा सर्वसाधारण व आदिवासी शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आयोजित केली जाणार आहे. पिकस्पर्धेसाठी तालुका पातळीवर सर्वसाधारण गटातील किमान १० स्पर्धक तर आदिवासी गटातील किमान ५ स्पर्धकांचा सहभाग आवश्यक असून त्याकरीता भाग घेण्यासाठी ३०० रु. प्रति शेतकरी प्रति पीक याप्रमाणे प्रवेश शुल्क आकारले जाईल. तालुका पातळीवरील स्पर्धेच्या निकालावरुन पुढे जिल्हा, विभाग व राज्यपातळीवरील बक्षीसे जाहीर केली जाणार आहेत.

एक शेतकरी एकापेक्षा अधिक पिकासाठी स्पर्धेत भाग घेऊ शकेल. पूर्वी जिल्हा व राज्यपातळीवर सरसकट सर्वांना भाग घेता येत नव्हता आणि जिल्हा व राज्यपातळीवर वेगवेगळे शुल्क आकारण्यात येत होते, आता सर्व पातळीवर एकदाच थेट सहभाग घेता येणार असून त्यासाठी एकदाच ३०० रु.प्रति शेतकरी प्रति पीक प्रवेश शुल्क भरून पीक कापणी वरुन आलेल्या उत्पादकतेच्या आकडेवारीनुसार त्याची तालुका, जिल्हा, विभाग व राज्यपातळीवर निवड केली जाणार आहे. याशिवाय पारितोषिकाच्या रकमेमध्ये भरीव वाढ करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी क्षेत्रीय स्तरावर कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!