भस्सकण बिबट्याच त्याच्या अंगावर आला…
पन्हाळा :
प्रसंग आज बुधवारचा. वेळ पहाटे तीन वाजून तीन मिनिटाची. पन्हाळ्याच्या डॉक्टर राज व नीता होळकर यांच्या बंगल्याच्या आवारातील डँगो कुत्र्याला कशाची तरी चाहूल लागली. कडक थंडीत अंगाची मुटकुळी करून झोपलेला हा पठ्ठ्या उठला. आणि बंगल्याच्या दरवाज्याच्या दिशेने गेला. इकडे तिकडे बघू लागला. आणि समोरून भस्सकण बिबट्याच त्याच्या अंगावर आला.
डँगोची वेळ चांगली. तो झटकन माघारी फिरला. आणि बंगल्याच्या आवारातील लोखंडी खुर्चीखाली घुसला. बिबट्याही भूकावलेला. तो डँगोच्या दिशेने पुन्हा वळला. पण समोर बिबट्याला म्हणजे साक्षात आपल्या मृत्यूला पाहून डँगो कळवळून भुंकू लागला. या आवाजाने बंगल्यातील डॉक्टर होळकर उठले. त्यांनी पोर्च मधले लाईट लावले. जोरात ओरडा सुरु केला. अर्थात बिबट्या बंगल्याच्या कुंपणावरून उडी मारुन माघारी गेला.
पुढे कितीतरी वेळ डँगो मृत्यूच्या दाढेतून वाचूनही थरथर कापतच राहिला. आपल्या बंगल्याच्या आवारातला बिबट्या आणि कुत्र्याच्या जगण्या-मरण्याचा हा खेळ डॉ.होळकर यांनी महिनाभरात दुसऱ्यांदा स्पष्ट अनुभवला.
त्यांच्या सीसी टीव्ही कॅमेर्यातही हा प्रसंग टिपला गेला.सकाळी अनेक जण डॉक्टरांना म्हणाले, तुमच्या बंगल्याच्या आवारात बिबट्या सारखा येतो. भीती नाही वाटत? डॉक्टरांनी नेहमी प्रमाणे उत्तर दिले. “पन्हाळ्यात माझ्या अगोदर पासून बिबट्या आहे. आम्ही त्याच्यानंतर आहे. त्यामुळे इथे खरी वहीवाट बिबट्याची व नंतर आमची आहे….”
( सुधाकर काशीद,पत्रकार )