निवडणूक : नोडल अधिकाऱ्यांनी निवडणूक कामकाज चोखपणे पार पाडावे
जिल्हाधिकारी राहुल रेखावार
कोल्हापूर :
जिल्ह्यात विधानपरिषद निवडणूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांनी निवडणूक विषयक कामकाज व सोपविण्यात आलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शाहूजी सभागृहात नोडल अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, उप जिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांच्यासह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहितेचे पालन होईल, याची दक्षता घ्यावी. यासाठी आवश्यक ती पथके तात्काळ स्थापन करावीत. मतदार याद्या व मतदान केंद्रांच्या याद्या तात्काळ तयार करा. निवडणूक साहित्य खरेदीची प्रक्रिया वेळेत करुन घ्या. निवडणूक कामकाजासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करुन त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण लवकरात लवकर द्यावे.
जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, कोविड-19 प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर आदी खबरदारी घेवून निवडणुक कामकाज पार पाडावे. कोविड-19 चा प्रादुर्भाव विचारात घेता कम्युनिकेशन प्लॅन तयार करावा. मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रावर सॅनिटायझर, मास्क, फेस शिल्ड, थर्मल गन, सोडियम हायड्रोक्लोराईड व अन्य अनुषंगिक बाबी उपलब्ध करुन द्याव्यात. मतदान व मतमोजणीसाठी कार्यरत पथकाच्या आरोग्याची काळजी घ्यावी. यासाठी याठिकाणी प्रथमोपचाराचे साहित्य, ॲम्ब्युलन्स व आवश्यक औषधे तयार ठेवावीत. मतदान केंद्रावर वेबकास्टिंग करा. मतदारांना मतदान केंद्रावर सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नियोजन करा. तक्रार निवारण कक्ष स्थापन करा.
मतदान याद्या व मतदान केंद्र याद्या तयार करणे, कायदा व सुव्यवस्था, आदर्श आचारसंहिता, , निवडणूक कामकाजासाठी आवश्यक अधिकारी, कर्मचाऱ्यांचे नियुक्ती आदेश काढणे, मतदान अधिकारी, कर्मचारी, क्षेत्रीय अधिकारी, मतमोजणी अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्षण सत्रे आयोजित करणे, साहित्य खरेदीसाठी निविदा, ई-निविदा कामकाज, मतपत्रिका छपाई व वाटप, निवडणुक निरीक्षक व्यवस्था, संगणक कक्ष व एसएमएस वेबकास्टींग, जिल्हा निवडणूक व्यवस्थापन आराखडा, स्ट्राँगरुम व मतमोजणी केंद्राचे व्यवस्थापन आदी विविध बाबींचा आढावा यावेळी घेण्यात आला.
आदर्श आचारसंहिता राबवून निवडणूक पार पाडण्यासाठी करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे व निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी माहिती दिली.
मतदार याद्या, मतदान केंद्र यादी तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने कामकाजाची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांनी दिली.
नोडल अधिकाऱ्यांनी सोपविण्यात आलेली जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी करण्यात येत असलेल्या नियोजनाबाबत बैठकीत माहिती दिली.
विधान परिषद निवडणूक कार्यक्रम…
महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोल्हापूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाचे सदस्य सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांची मुदत दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी संपत आहे. याअनुषंगाने रिक्त होणाऱ्या जागेसाठी भारत निवडणूक आयोगाने कोल्हापूर स्थानिक प्राधिकारी मतदार संघ विधान परिषद निवडणूक 2021 चा कार्यक्रम घोषित केला आहे.
निवडणुकीसाठी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात त्वरीत आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीच्या आचारसंहितेचे सर्वांनी तंतोतंत पालन करण्याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
विधानपरिषद निवडणूक कार्यक्रमाचा तपशील-
निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा दिनांक- 16 नोव्हेंबर 2021 (मंगळवार),
नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिनांक-23 नोव्हेंबर 2021 (मंगळवार),
नामनिर्देशन पत्राची छाननी- 24 नोव्हेंबर 2021 (बुधवार),
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक-26 नोव्हेंबर, 2021 (शुक्रवार),
मतदानाचा दिनांक- 10 डिसेंबर, 2021 (शुक्रवार),
मतदानाची वेळ- सकाळी 8 ते सायं. 4 वाजेपर्यंत,
मतमोजणीचा दिनांक- 14 डिसेंबर 2021 (मंगळवार),
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक- 16 डिसेंबर, 2021 (गुरुवार) याप्रमाणे कार्यक्रम आहे.