नुकसान भरपाई १३५ शासनाला परत करणार राजू सूर्यवंशी
करवीर तहसीलदार कार्यालयावर शेतकर्यांचा मोर्चा
करवीर :

सन २०१९ मध्ये महापुरातील नुकसानीला सरसकट प्रतिगुंठा ९५० रुपये भरपाई देण्यात आली, २०२१ मध्ये त्यापेक्षाही जास्त प्रमाणात पूर आला व जास्त प्रमाणात नुकसान झाले, मात्र सरकारने या वेळी प्रति गुंठा १३५ रुपये प्रमाणे नुकसानभरपाई जाहीर केली आहे. ही मदत म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे, १३५ रुपये आम्हाला देऊ नये,१००० रुपये प्रति गुंठा देण्यात यावा, तसेच एकशे पस्तीस रुपये दिले तर हे पैसे पुन्हा शासनाला परत केले जातील, या मागणीसह विविध मागण्यांसाठी करवीर तालुक्यातील शेतकरी व सर्वपक्षीय नेते कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. मागणीचे निवेदन तहसीलदार शितल भामरे मुळे यांना दिले.
यावेळी बोलताना राजेंद्र सूर्यवंशी म्हणाले, एकशे पस्तीस रुपये ची मदत आम्हाला देण्यात येऊ नये, नुकसानभरपाईसाठी सरसकट जमिनीचे क्षेत्र धरण्यात यावे, जिल्ह्यातील प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार तात्काळ द्यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी नामदेव गावडे म्हणाले, मुख्यमंत्री यांनी चाळीस हजार देऊ अशी ग्वाही दिली होती, आणि १३५ रुपये देऊन शेतक-यांची चेष्टा सुरू केली आहे. वीज दर, खतांचे दर वाढले सर्व घटकांचे दर वाढले मात्र शेतीमालाचे दर वाढले नाहीत. ऊस पिकाचा विमा काढला जात नाही ,पूर,व महागाईने शेतकरी व ऊस उत्पादक शेतकरी देशोधडीला लागला आहे, भविष्यात पिकणारा शेतमाल शहराकडे पाठवायचा नाही अशा पद्धतीचे आंदोलन करावे लागणार आहे.
यावेळी टी. एल .पाटील म्हणाले २०१९ पेक्षा यंदा आठ फूट पुराचे पाणी वाढले, मात्र लाभार्थींची संख्या आणि क्षेत्र कसे काय कमी झाले आहे. आम्हाला नुकसान भरपाई देता येत नसेल तर ,यापुढे आम्ही वीज बिल भरणार नाही, शेतसारा भरणार नाही, शेतकऱ्यांच्या तुन आता उद्रेक होण्याची वेळ आली आहे.
यावेळी मार्केट कमिटीचे माजी दशरथ माने, कॉ.नामदेवराव गावडे, वडणगे सरपंच सचिन चौगले, बाळासो वरुटे, बालिंगे सरपंच मयूर जांभळे, पाडळी सरपंच तानाजी पालकर, प्रा. टी. एल. पाटील, जगदीश पाटील, उत्तम पाटील, सुनील कापडे, धनंजय ढेंगे, शिवराज पाटील,सरदार पिंजरे,संजय जाधव,संजय दिवसे, बाबुराब हिलगे, प्रकाश पाटील, पांडुरंग शिंदे, सुशांत जासूद, सुनील पाटील, संपत भोसले, करण पाटील, आदी शेतकरी उपस्थित होते.