कोपार्डे येथे कॉग्रेस ,राष्ट्रवादी, शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको
करवीर :
उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ काँग्रेस, राष्ट्रवादी व शेतकरी संघटनेच्या वतीने कोपार्डे फाटा येथे निदर्शने करण्यात आली. सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी गोकुळ संचालक बाळासाहेब खाडे म्हणाले, भाजपला संविधान माहिती नाही, कितीही शेतकऱ्यांना, नागरिकांना तुम्ही चिरडून मारा मात्र आता शेतकरी आणि आम्ही थांबणार नाही. जोपर्यंत, त्या मंत्र्यांच्या मुलग्याला शिक्षा होत नाही तोपर्यंत आंदोलन तीव्र करण्यात येईल. भाजप सरकार शेतकऱ्यांना मारण्याचे पाप करत आहे.
यशवंत बँक अध्यक्ष एकनाथ पाटील म्हणाले, देशातील नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी मंत्री यांची असताना आंदोलनातील लोकांनाच चीरडून मारले जात आहे,यामुळे भाजप सरकारला आता घरचा रस्ता दाखवावा लागेल, महागाईने आगडोंब उसळला आहे नागरिकांना जगणे मुश्किल झाले आहे.
कुंभी कारखाना माजी अध्यक्ष संभाजी पाटील म्हणाले, गॅसचे, पेट्रोलचे दर वाढले. सर्वसामान्य जनतेला जगणे मुश्कील झाले आहे, यामुळे भाजप सरकार चलेजाव असा नारा त्यांनी दिला.
यावेळी करवीर पंचायत समिती उपसभापती अविनाश पाटील ,संजय पाटील, सरदार पाटील यांचे मनोगत झाले.
यावेळी पैलवान संभाजी पाटील ,एस.के.पाटील, नामदेव पाटील, सर्जेराव पाटील, सुभाष पाटील ,उत्तम कासोटे ,गुणाजी शेलार, युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सरदार पाटील, राष्ट्रवादीचे पदवीधर सेलचे युवराज पाटील, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते.