स्वच्छता ही सेवा अभियान प्रारंभ : जिल्ह्यातील गावागावात स्वच्छता मोहीम यशस्वी करा : जि.प.अध्यक्ष राहुल पाटील
करवीर :
घरापासूनच सुरुवात करावी म्हणून सडोली खालसा गावातून स्वच्छता मोहिमेला प्रारंभ केला आहे. कोल्हापूर जिल्हा स्वच्छतेच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर राहिला आहे. त्याच्याही पुढे आपणास एक पाऊल पुढे टाकायचे आहे. स्वच्छता ही मोहीम सर्वांनी एकत्र येऊन राबवायची आहे. जि.प.सदस्य, पं.स.
सदस्य, पदाधिकारी, ग्रामपंचायत यांनी या महिमेत पुढाकार घ्यावा. रोगराई, गंभीर साथीचे आजार थोपविण्यासाठी जिल्ह्यातील गावागावात स्वच्छता मोहीम यशस्वी करा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी केले.
सडोली खालसा (ता.करवीर) येथे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील स्वच्छता ही सेवा अभियानाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. सीईओ संजयसिंह चव्हाण, जलजीवन मिशनच्या प्रकल्प संचालिका प्रियदर्शनी मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांच्या स्वच्छता संदेश देणाऱ्या सायकल रॅलीचे उद्घाटन, ग्रामपंचायत घनकचरा घंटागाडीचे लोकार्पण, प्राथमिक शाळेत वृक्षारोपण तसेच कोरोना योद्धे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. स्वच्छतेची सामूहिक शपथ घेण्यात आली.
सीईओ संजयसिंह चव्हाण म्हणाले, उत्तम आरोग्यासाठी स्वच्छता गरजेची आहे. परिसर स्वच्छतेबरोबर मनाची व आरोग्याचीही स्वच्छता झाली पाहिजे. शाळांमधून मुलांमध्ये स्वच्छतेची सवय रुजली पाहिजे. चांगल्या सवयीतून चांगले काम होउ शकते. कोरोना काळात स्वच्छतेचे महत्त्व खूप आहे. युवकांनी या स्वच्छता मोहिमेत एकत्र यावे. केवळ दिखाव्यासाठी नको तर मनाने स्वच्छता मोहीम कायमपणे राबवा.
उद्योजक रविंद्र पाटील म्हणाले, जि.प.अध्यक्ष व सीईओ यांनी जिल्ह्याचा स्वच्छता मोहिमेचा आरंभ आमच्या गावातून केल्यामुळे ग्रामस्थ म्हणून आपली सर्वांची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे आपला गाव स्वच्छ आणि सुंदर राहील यासाठी सर्वजण प्रयत्न करूया. स्वच्छतेत गावचा असा एक आदर्श निर्माण करूया असे आवाहन केले.
प्रारंभी जलजीवन मिशनच्या प्रकल्प संचालिका प्रियदर्शनी मोरे यांनी या मोहिमेविषयी माहिती दिली. सरपंच अमित पाटील यांनी स्वागत केले. करवीर पं.स. बीडीओ जयवंत उगले यांनी आभार मानले. याप्रसंगी गोकुळचे माजी संचालक उदय पाटील, पं.स. सदस्या सविता पाटील, उपसरपंच तेजस्विनी पाटील, पोलीस पाटील पंकजकुमार पवार पाटील, राजाराम पाटील, नामदेव साळुंखे, प्रा.संजय साळोखे, तंटामुक्त अध्यक्ष राजेंद्र पाटील, ग्रामसेवक पी.एम.भोपळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थाचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. पवन पाटील यांनी केले.
.