यशवंत बँकेला १ कोटी २१ लाखांचा नफा : अध्यक्ष एकनाथ पाटील
करवीर :
श्री यशवंत सहकारी बँकेला गत आर्थिक वर्षात निव्वळ नफा एक कोटी २१ लाखाचा झाला असून एकूण २०५ कोटीचा व्यवसाय झाला आहे. सभासदांच्या मागणीनुसार १० टक्के लाभांश देण्याचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी यावेळी जाहीर केले .
४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन पार पडली, यावेळी बोलताना अध्यक्ष पाटील म्हणाले, कोरोना चे सर्वत्र संकट असतानाही बँकेने उत्कृष्ट कामगिरी केली आहे .१०७ कोटी ठेवी मध्ये २५ कोटी वाढ झाली आहे. आता सव्वाशे कोटींच्या ठेवी झाल्या आहेत, अकरा कोटी कर्ज वाढले, असून १७.७४ टक्के बँकेचा ग्रोथ रेट झाला आहे . यामध्ये सभासद ,कर्मचारी, व ग्राहकांचे योगदान आहे.
बँकेच्या वतीने अण्णासाहेब पाटील महामंडळ अंतर्गत तरुणांना सतरा कोटीचे कर्ज वाटप केले, यापैकी एकही कर्ज प्रकरण अद्याप थकीत नाही,ही चांगली बाब आहे. मराठा समाजाबरोबर इतर समाजाच्या तरुणांना सुद्धा कर्जाचे वाटप केले आहे. सोने तारण कर्जाचे दहा टक्के व्याज दर करण्यात आले असून कर्जाचे व्याजदर कमी करून स्पर्धात्मक ठेवण्यात आले आहेत. बँकेने आधुनिक सुविधा सभासदांना व ग्राहकांना पुरवल्याचे यावेळी सांगितले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब कांबळे यांनी प्रास्ताविक , विषय वाचन संभाजी पाटील यांनी केले.
यावेळी लक्ष्मण पाटील यांनी ऑफ लाईन सभा का घेतली नाही, ऑनलाइन सभा असताना अहवाल का वाटले ,अहवाल ही ऑनलाईन का दिले नाही प्रश्न मांडला, यावेळी बी बी पाटील यांनी बीड शाखेची जागा खरेदी केली का, आणि बँकेत कर्जे वाढली त्या पट्टीत नफा वाढला नाही असे प्रश्न करून एकरकमी एफ आर पी देण्यात यावी, असा ठराव मांडला.
यावेळी मनोहर पाटील यांनी अण्णासाहेब पाटील महामंडळ व्याज परतावा व बँकेचे व्याज यामध्ये फरक असून व्याजाचा भुर्दंड तरुणांना बसत आहे ,तो कमी करावा अशी मागणी केली, यावेळी पंडित मस्कर यांनी कर्जाला मासिक व्याज आकारणी करावी अशी मागणी केली, दिलीप पाटील यांनी एका कर्जावर व्याज आकारले नाही,असा मुद्दा उपस्थित केला, यावर शाखा अधिकाऱ्यांनी असे कोणतेही कर्ज नसल्याचे सांगितले. यावेळी उपाध्यक्ष हिंदुराव तोडकर, संचालक सर्जेराव पाटील, यशवंत शेलार ,बाजीराव खाडे, आनंदराव पाटील ,प्रकाश देसाई ,टीएल पाटील, सुभाष पाटील, उत्तम पाटील उपस्थित होते.