द्रुतगती मार्गावरील वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांना शोधून काढत त्यांना जवळच्या टोलनाक्यावर रोखले जाणार : अत्याधुनिक यंत्रणा लवकरच कार्यान्वित
मुंबई :
मुंबई-पुणे या ९४ किमीच्या द्रुुतगती मार्गावरून दिवसाला अंदाजे ६० हजार वाहने जातात,
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बेशिस्त वाहतूक नियंत्रित करण्यासाठी, वाढत्या अपघातांना रोखण्यासाठी आणि वाहनचालक-प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (आयटीएमएस) कार्यान्वित होणार आहे.आयटीएमएस यंत्रणा कार्यान्वित झाल्यास वेगाचे नियम मोडणाऱ्या, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांना शोधून काढत त्यांना जवळच्या टोलनाक्यावर रोखले जाणार असून त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई केली जाईल.
दोन वर्षांपासून रखडलेली निविदा प्रक्रिया महिन्याभरात पूर्ण होणार आहे.
आर्थिक अडचणीमुळे अत्याधुनिक अशी ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रकल्प दोन वर्षे रखडला होता; पण आता मात्र राज्य सरकारकडून ४० कोटी रुपयांचा निधी लवकरच उपलब्ध होणार असल्याने ‘आयटीएमए’च्या अंमलबजावणीसाठीची दोन वर्षांपासून रखडलेली निविदा महिन्याभरात अंतिम करण्यात येणार आहे.
मुंबई-पुणे या ९४ किमीच्या द्रुुतगती मार्गावरून दिवसाला अंदाजे ६० हजार वाहने जातात. या मार्गावरील वाहतुकीसाठी अनेक नियम आखून देण्यात आले असून त्याचे काटेकोर पालन वाहनचालकांकडून केले जात नसल्याने द्रुतगती मार्गावरील अपघातांमध्ये मागील काही वर्षांत मोठी वाढ झाली आहे.
द्रुतगती मार्गावरील वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी असलेली यंत्रणा तोकडी पडत असल्याने अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित करून बेशिस्त वाहनचालकांना आळा घालण्यासाठी आणि अपघात रोखण्यासाठी ‘आयटीएमएस’चा पर्याय एमएसआरडीसीने निवडला आहे. अंदाजे १६० कोटी रुपये खर्च करत ‘सार्वजनिक-खासगी सहभाग तत्त्वावर ही यंत्रणा द्रुतगती मार्गावर कार्यान्वित करण्यात येणार आहे.
त्यानुसार संपूर्ण मार्गावर अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असून ३९ ठिकाणी वाहनांचा वेग तपासणारी अॅव्हरेज स्पीड डिटेक्शन सिस्टम’ बसविण्यात येणार आहे. तर ३४ ठिकाणी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना शोधणारी अशी ‘लेन डिसिप्लेन व्हायलेशन डिटेक्शन सिस्टम’ बसविण्यात येणार आहे.
अपघात झाल्यास त्या ठिकाणी तात्काळ आवश्यक ती मदत पुरविली जाणार असल्याची माहिती एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.