कोल्हापूर :
गोकुळ, कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीसाठी पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात एप्रिलला मतदान होण्याची शक्यता आहे. प्रारुप मतदार यादी सोमवारी १५ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे.
कोरोना मुळे निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. नुकतेच प्राधिकरणाने निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. विभागीय निबंधक दुग्ध, सुनील शिरापूरकर यांनी गोकुळ च्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
१४ डिसेंबर ला ठराव संकलित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. २२ जानेवारीला अखेरच्या दिवशी ३ हजार ७६४ संस्थांचे ठराव दाखल झाले. यामध्ये १०५ संस्थांचे ठराव दुबार होते.
याबाबत झालेल्या सुनावणीत सात संस्था मध्ये समझोता झाला. आता प्रारूप यादी दुबार ठरावा सह प्रसिद्ध होणार आहे. यावर २४ फेब्रुवारी पर्यंत हरकती दाखल करता येणार आहेत. यामध्ये ठरावाचे नाव बदलणे, नव्याने निवडणूक झालेल्या संस्थेत संचालकांच्या नावाचा ठराव समाविष्ट करणे, ठराव धारकांचे निधन झाल्यास ते बदलणे, ही प्रक्रिया होणार आहे.बारा मार्च ला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होऊन, दहा दिवसा च्या कालावधी नंतर साधारण २५ मार्च पासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता, आणि पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात एप्रिल ला मतदान होण्याची शक्यता आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे.