करवीर निवासिनी अंबाबाईच्या
अर्पण साड्यांची शनिवारपासून विक्री
कोल्हापूर :
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी/अंबाबाईला भाविकांकडून अर्पण केलेल्या प्रसाद साड्या देवस्थान समितीकडे उपलब्ध आहेत. या साड्यांची श्री. त्र्यंबोली देवस्थान, देवस्थान व्यवस्थापन समिती हॉल, टेंबलाईवाडी येथे शनिवारपासून विक्री केली जाणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सचिव शिवराज नाईकवडे यांनी केले आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुनच साड्यांची विक्री होणार आहे. प्रसाद साडी विक्री सकाळ सत्रामध्ये सकाळी 8 ते 11 साठी 100 कुपन व दुपार सत्रामध्ये दु. 2 ते 5 साठी 100 कुपन देण्यात येतील. त्यानुसार प्रथम येणाऱ्यांना प्रथम साडी दिली जाईल. जे भाविक प्रसाद साडी खरेदीसाठी येणार आहेत त्या भाविकांना कुपन देण्यात येणार असून कुपन घेण्यासाठी एकाच व्यक्तीने गर्दी न करता सुरक्षित अंतर ठेवून रांगेतून कुपन घ्यावे.
साड्यांवर जे देणगी मूल्य असेल त्याच्या 60 टक्के रक्कम आकारणी करून ती देवस्थान समितीकडे जमा केल्यानंतर पावती दिली जाईल. प्रत्येक भाविकाला जास्तीत जास्त पाच साड्या घेता येतील. त्यासाठी भाविकांनी आधारकार्डाची छायांकित प्रत घेऊन यावे. त्यावर आपला भ्रमणध्वनी/दूरध्वनी क्रमांक नमुद करावा. प्रसाद साडीची घडी न उघडता जशी आहे तशीच घेता येईल. भाविकांमार्फत खरेदी केलेली प्रसाद साडी कोणत्याही कारणास्तव बदलून दिली जाणार नाही, असे आवाहनही समितीतर्फे केले आहे.