बँक संचालक मंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय
कोल्हापूर, दि. २७
कोल्हापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी व महापुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे केडीसीसी बँक पुनर्गठन करणार आहे. बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा देणारा हा महत्त्वपूर्ण निर्णय झाला.
जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी, महापूर व भूस्खलनामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशा बाधित शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सल्लागार समितीची सभा दोन ऑगस्ट रोजी झाली. या संदर्भातच चार ऑगस्ट रोजी महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बँकर्स समितीचीही सभा झाली.
याबाबत अधिक माहिती अशी, सरकारी पंचनाम्यानुसार ३० ते ५० टक्क्यांच्या दरम्यान पिकांचे नुकसान झालेल्या कर्जदार शेतकऱ्यांच्या अल्पमुदत कर्ज व त्यावरील व्याजाचे दोन वर्षासाठी पुनर्गठन केले जाणार आहे. त्यापैकी एक वर्ष सवलतीचा कालावधी आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बाधित क्षेत्रासाठी नवीन पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच, ५० टक्क्यापेक्षा जास्त पिकाचे नुकसान झालेल्या कर्जदार शेतकऱ्यांच्या अल्पमुदत व त्यावरील व्याजाचे पाच वर्षासाठी पुनर्गठन केले जाणार आहे. यामध्येही एक वर्ष कालावधी सवलतीचा व शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बाधित क्षेत्रासाठी नवीन पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.
या योजनेत नैसर्गिक आपत्तीवेळी थकबाकीत असलेले कर्ज वगळता पीक कर्जासह अल्प मुदतीची कर्जे पुनर्रचनेसाठी पात्र आहेत. अल्पमुदत कर्ज व त्यावरील देय व्याज पुनर्गठित केले जाणार आहे. कर्ज असलेली शेती उपकरणे व साधनांचेही पुरामुळे नुकसान झाले असल्यास त्यांनाही मागणीनुसार नवीन कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. विशेष म्हणजे यासाठी शेतकऱ्यांच्याकडून कोणतेही ज्यादा तारण घेतले जाणार नाही.
पूरबाधित दुकानदारांनाही मिळणार दिलासा……
केडीसीसी बँक शेतकऱ्यांच्या या योजनेच्या धर्तीवरच महापूरबाधीत नुकसानग्रस्त दुकानदारांनाही दिलासा देणारी योजना लवकर जाणार आहे. या योजनेला संचालक मंडळाच्या बैठकीत तत्त्वतः मान्यता देण्यात आली. यासंदर्भात बँक लवकरच धोरण ठरविणार आहे.
यावेळी संचालक मंडळातील आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार राजूबाबा आवळे, माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, सर्जेराव पाटील- पेरीडकर, पी. जी. शिंदे, विलासराव गाताडे, अनिल पाटील, आर. के. पोवार, अशोकराव चराटी, बाबासाहेब पाटील, -आसुर्लेकर, प्रताप उर्फ भैय्या माने, असिफ फरास, संतोष पाटील आदी सदस्य तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने उपस्थित होते.