करवीर, हातकणंगले तालुक्यातील गावांना पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागू नये, यासाठी
उपाययोजनांबाबत लवकरच बैठक
◆ करवीर, हातकणंगले तालुक्यातील पूरबाधित गावांची पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडून
बांधावर जाऊन पाहणी
◆ पूरबाधित नागरिकांशी संवाद साधून जाणून घेतल्या अडीअडचणी
कोल्हापूर :
करवीर आणि हातकणंगले तालुक्यातील गावांना पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागू नये, यासाठीच्या उपाययोजना राबविण्याबाबत रेल्वे विभागासह संबंधित विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत लवकरच बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.
यंदाच्या पुराचा फटका करवीर आणि हातकणंगले तालुक्यालाही बसला. या भागातील ऊस शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. करवीर तालुक्यातील वळीवडे, चिंचवाड, वसगडे या पूरबाधित गावांतील शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी आज जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन केली. तर वळीवडे येथील ऊस शेतीच्या नुकसानीची पाहणी ट्रॅक्टरमधून केली. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, करवीर प्रांताधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार शितल मुळे-भामरे, गट विकास अधिकारी जयवंत उगले, पंचायत समिती सभापती मंगल पाटील, पदाधिकारी, अधिकारी, गावचे सरपंच, ग्रामसेवक, पूर बाधित नागरिक उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांनी पूरबाधित नागरिकांची निवेदने स्वीकारुन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.
वळीवडे, चिंचवाड भागातून रेल्वे मार्ग जात असून याखालील भरावामुळे नदीचे पाणी अडवले जाऊन हे पाणी शेतात पसरते. त्यामुळे पुरपरिस्थिती गंभीर होवून पिकांचे नुकसान होते. यासाठी रेल्वे मार्ग उंचावर करुन याठिकाणी कमानी करण्यात याव्यात, जेणेकरून नदीच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होणार नाही. त्याचबरोबर वळीवडे ते चिंचवाड दरम्यान असणाऱ्या पंचगंगा नदीवरील व ओढ्यावरील पुलाखालील भराव काढून कमानी करण्यात याव्यात, ओढ्यावरील व नदीपात्रातील अतिक्रमणे काढावीत आदी उपाययोजना करण्याची विनंती पूरबाधित नागरिकांनी केली. यावर पालकमंत्री सतेज पाटील यांनी पूरपरिस्थितीमुळे नागरिकांचे व शेतीचे नुकसान होवू नये, यासाठी ठोस उपाययोजना करण्याबाबत रेल्वे विभागासह संबंधित अन्य विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल, असे सांगितले. पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करा. पंचनामे जलदगतीने करा, जेणेकरून मदत वेळेत पोहोचवता येईल. पूरबाधित कोणताही नागरिक मदतीपासून वंचित राहता कामा नये, याची दक्षता घ्या, अशा सूचना पालकमंत्री श्री. पाटील यांनी यंत्रणेला केल्या.
उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर व तहसीलदार शितल मुळे यांनी झालेल्या नुकसानीबाबत व पंचनाम्यांबाबत माहिती दिली. वळीवडे गावातील सुमारे 350 हेक्टर तर चिंचवाड गावातील अंदाजे 325 हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले असून पंचनामे लवकरच पूर्ण होतील, असे तहसीलदार शितल मुळे यांनी सांगितले.