राज्यात १५ ऑगस्टपासून दुकाने, उपाहारगृहे आणि मॉल्स आठवड्याचे सातही दिवस रात्री १० पर्यंत खुले ठेवण्यास परवानगी
मुंबई :
करोना रुग्णसंख्या कमी झाल्याने,
राज्यात १५ ऑगस्टपासून दुकाने, उपाहारगृहे आणि मॉल्स आठवड्याचे सातही दिवस रात्री १० पर्यंत खुले ठेवण्यास परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. धार्मिक स्थळे, चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे मात्र बंदच राहणार आहेत.
लसीकरण पूर्ण झालेल्यांना रेल्वे प्रवासास परवानगी देण्याबाबत विचार करण्याची सूचना उच्च न्यायालयाने केली होती. रेल्वे, दुकाने, उपाहारगृहे, मॉल्स आदी सुरू करून अर्थचक्र अधिक गतिमान करण्याबरोबरच राज्यातील सामान्य जनतेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलासा दिला आहे. १५ ऑगस्टपासून निर्बंध शिथिल होणार आहेत.
राज्य शासनाचे नवीन नियम व अटी यांचा आदेश मिळाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यासाठी निर्णय घेतला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
मुंबई, ठाणे वगळता राज्यात अन्यत्र दुकाने रात्री ८ पर्यंत खुली ठेवण्यास गेल्या आठवड्यात मुभा देण्यात आली होती. नव्या आदेशानुसार राज्यात सर्वत्र दुकाने रात्री १० पर्यंत खुली राहतील. मॉल्सनाही रात्री १० पर्यंत परवानगी देण्यात आली आहे.
मॉलमध्ये प्रवेश करताना लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याची अट घालण्यात आली आहे. उपाहारगृहे सायंकाळी ४ पर्यंत खुली ठेवण्यास सध्या परवानगी आहे. ही वेळ रात्री उशिरापर्यंत वाढवून देण्याची मागणी उपाहारगृहांच्या संघटनेकडून करण्यात येत होती. उपाहारगृहे रात्री १० पर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. बारही रात्री १० पर्यंत खुले राहू शकतील.
शाळानिर्णय लांबणीवर….
राज्यातील शाळा १७ ऑगस्टपासून सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाच्या अंगलट आला आहे. १८ वर्षांखालील मुलांचे लसीकरण झालेले नसतानाही त्यांना शाळेत बोलावणे धोक्याचे असल्याची भूमिका घेत कृतिदलाने शाळा सुरू करण्यास विरोध दर्शवला. शाळांबाबतचा निर्णय दिवाळीनंतरच घेण्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत.
खासगी कार्यालये २४ तास खुली….
गर्दी टाळण्यासाठी खासगी कार्यालये २४ तास खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कार्यालयांमध्ये एका सत्रात फक्त २५ टक्क्यांपर्यंत कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीस परवानगी असेल.
विवाह सोहळ्यातील उपस्थितीत वाढ….
खुले प्रांगण किं वा लॉनमध्ये होणाऱ्या विवाह समारंभात क्षमतेच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त २०० जणांना परवानगी दिली जाईल. बंदिस्त मंगल कार्यालयांमध्ये १०० जणांनाच उपस्थित राहण्याची परवानगी असेल. सध्या ५० जणांच्या उपस्थितीला परवानगी होती. त्यात आता वाढ करण्यात आली आहे.
चौपाट्या, व्यायामशाळा सुरू….
राज्यातील सर्व मैदाने, उद्याने, चौपाट्या, समुद्र किनारे स्थानिक प्राधिकरणाने निश्चिात के लेल्या वेळेत सुरू करता येतील. व्यायामशाळा, ब्युटी पार्लर, स्पा आदी रात्री १० पर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मैदानी खेळाबरोबरच इनडोअर खेळांनाही मुभा असेल.
प्राणवायूची मागणी वाढल्यास टाळेबंदी…..
निर्बंध शिथिल करतानाच संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन राज्यातील प्राणवायूची मागणी ७०० मेट्रिक टनाच्या पुढे जाताच राज्यात संपूर्ण टाळेबंदी लागू होईल, असा निर्णयही मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यात सध्या १३०० मेट्रिक टन प्राणवायू निर्मिती होते. राज्याने प्राणवायू निर्मिती प्रकल्पांची उभारणी सुरू केली आहे. त्यामुळे राज्याची प्राणवायू निर्मिती क्षमता १७०० ते २००० मेट्रिक टनापर्यंत जाईल. संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करता दुसऱ्या लाटेच्या उच्चांकी परिस्थितीत जेवढा प्राणवायू लागला त्याच्या दीडपट तयारी करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. त्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेत प्राणवायूची मागणी ७०० मेट्रिक टनाच्या पुढे गेल्यास राज्यात कडक टाळेबंदी लागू करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले.
धार्मिकस्थळे, चित्रपटगृहे,नाट्यगृहे बंदच…..
धार्मिक स्थळे तूर्त बंदच राहतील. सणासुदीचे दिवस असल्याने मंदिरे उघडल्यास गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊनच धार्मिक स्थळे आताच खुली न करण्याचा निर्णय घेण्यात आला. नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. नाट्यगृहे सुरू करण्यासाठी रंगकर्मींनी आंदोलनही के ले होते. मात्र, याबाबत सरकारने सावध पवित्रा घेतला आहे. काही क्षेत्रांमध्ये निर्बंध शिथिल करण्याची मागणी होत असली तरी संपूर्ण काळजी घेऊन निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.