कोल्हापूर :

जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळे नागरिक व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पूरामध्ये नुकसान झालेल्या कर्जदारांना त्यांच्या कर्जाच्या खात्याचे पुनर्गठन करताना व पूरबाधित पात्र कर्जदारांना नवीन कर्जपुरवठा करताना बँकांनी सहकार्य करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या.

 कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त कर्जदारांना बँकांतर्फे देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत जिल्हास्तरीय बँकर्स सल्लागार समितीची विशेष बैठक जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक हेमंत खेर, बँक ऑफ महाराष्ट्रचे विभागीय व्यवस्थापक संदीपकुमार चौरसिया, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक राहुल माने, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक आशुतोष जाधव,  जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, कृषी विभागाच्या सहसंचालक भाग्यश्री पवार, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक माने तसेच विविध बँकांचे जिल्हा समन्वयक उपस्थित होते.

पूर परिस्थितीमुळे खंडित झालेल्या सर्व बँकिंग सेवा सुरळीत करा. पूर परिस्थितीमुळे खराब झालेले पासबुक व एटीएम कार्ड पुन्हा तयार करुन द्यावेत. तर जिल्ह्यातील आधार सेवा केंद्र चालकांनी खराब झालेले आधार कार्ड पुन्हा उपलब्ध करुन द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री रेखावार यांनी केल्या.

     शेतकरी, व्यावसायिक, कारागीर, सूक्ष्म व लघु उद्योजकांना रिजर्व बँकेच्या धोरणानुसार आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात.  पुरामुळे 33 ते 50 टक्क्यांच्या दरम्यान पिकांचे नुकसान झालेल्या कर्जदार शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन 2 वर्षासाठी करावे. यामध्ये 1 वर्षासाठी हप्त्याची सुट्टी राहील. 

पुरामुळे पिकाचे 50 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्यांचे कर्ज खाते 5 वर्षासाठी पुनर्गठीत करुन 1 वर्षाच्या हप्त्याची सुट्टी राहील. अशा बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार बाधित क्षेत्रासाठी नवीन पीककर्ज उपलब्ध करुन देण्यात यावे.

शेतीसाठी घेतलेल्या मुदत कर्जामध्ये पुरामुळे बाधित झालेल्या पिकावर अवलंबून असलेला हप्ता एक वर्षाने पुढे ढकलण्यात यावा. कर्ज असणाऱ्या शेती उपकरणे व साधनांचे पुरामुळे नुकसान झाले असल्यास त्यांना मागणीनुसार नवीन कर्ज उपलब्ध करुन द्यावे.
व्यावसायिक, कारागीर, सूक्ष्म, लघु उद्योजक व छोटे व्यापारी यांच्या कर्जाची प्रकरण निहाय तपासणी करुन हप्त्याचे पुनर्गठन किंवा हप्ता पुढे ढकलण्याची कार्यवाही करावी. या रिजर्व बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बँकांनी कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी दिले. शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करताना ऑनलाईन सातबारा ग्राह्य धरा, अशाही सूचना त्यांनी बैठकीत केल्या.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!