मुंबई :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांचा २०२१ उच्च माध्यमिक बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी ४ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल अखेर मंगळवारी जाहीर होणार असून बारावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा आता संपणार आहे. करोनामुळे यंदा ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. गेला महिनाभर राज्यात पडलेल्या पावसाचा, पूरपरिस्थितीचा फटका बारावीच्या निकाल प्रक्रियेला बसला होता. पाऊस आणि पुरामुळे काही शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांकडून निकाल प्रक्रियेसाठी मुदतवाढ मागितल्याने अंतिम टप्प्यात असलेली निकालाची प्रक्रिया लांबली होती.
परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहेत. तसेच त्यांची प्रिंन्टही घेता येणार आहे असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
कुठे पाहता येणार निकाल?
https://hscresult.11thadmission
https://msbshse.co.in
hscresult.mkcl.org
mahresult.nic.in
याशिवाय www.mahresult.nic.in व https://msbshse.co.in या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.
या वेबसाईटवरुन विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंट काढता येईल असं मंडळाने स्पष्ट केलं आहे.
असा पाहा निकाल –
• वरीलपैकी एका वेबसाईटवर जा
- वेबसाईटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा
- आसनक्रमांक टाका
- विचारलेली योग्य माहिती द्या (सामान्यपणे आईचे पहिले नाव विचारले जाते)
- निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल
- निकालाची प्रिंट आऊटही काढता येईल
दहावीच्या निकालावेळी मंडळाच्या वेबसाईटचा सर्व्हर डाऊन झाल्याने हजारो विद्यार्थ्यांना कित्येक तास त्यांचा निकाल पाहता आला नव्हता. त्यामुळे मंगळवारी जाहीर होणाऱ्या इयत्ता बारावीच्या निकालासाठी बोर्डाने चार नव्या वेबसाईटची स्वतःहून दिल्या आहेत. त्यामुळे एकाच वेबसाईटवर लोड येणार नसून विद्यार्थ्यांना निकाल पाहणं आणखी सोपं जाणार आहे. मंगळवारी दुपारी ४ वाजता ऑनलाईन पद्धतीने इयत्ता बारावीचा निकाल लागणार आहे.
निकाल कसा लागणार……
बारावीच्या निकालात इयत्ता दहावीच्या गुणांना ३० टक्के भारांश असेल. दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यानं सर्वाधिक गुण मिळवलेल्या तीन विषयांचे सरासरी गुण ग्राह्य धरले जातील. तर इयत्ता अकरावीचा ३० टक्के भारांश असणार आहे. इयत्ता अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण बारावीच्या निकालात देण्यात येणार आहेत. तर इयत्ता बारावीसाठी ४० टक्के भारांश असेल. बारावीच्या वर्गासाठी ४० टक्के भारांश निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये प्रथम सत्र निहाय परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या आणि मूल्यमापन यामधील विषय निहाय गुण यावर विद्यार्थ्यांना गुण दिले जातील.