पूरग्रस्तांना नुकसानभरपाई देण्यात विमा कंपन्यांनी टाळाटाळ केल्यास माझ्याशी गाठ : छत्रपती संभाजीराजेंचा इशारा
चिपळूण येथे पूरामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागांस संभाजीराजे यांनी भेट देऊन केली पाहणी
चिपळूण :
महापूरामुळे चिपळूण येथे मोठे नुकसान झाले आहे. येथील पुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागांस छत्रपती संभाजीराजे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी पूरग्रस्तांनी संभाजीराजे यांच्यापुढे आपल्या व्यथा मांडल्या.
यावेळी बोलताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, पूरग्रस्तांच्या समस्या जाणून घेताना प्रामुख्याने एक बाब लक्षात आली ती म्हणजे, नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यामध्ये विमा कंपन्या आडमुठी भूमिका घेत आहेत. या पुरामध्ये शेतकऱ्यांपासून व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांचेच नुकसान झालेले आहे. आधीच लॉकडाऊनमुळे डबघाईला आलेले व्यवसाय, या पुरामध्ये झालेल्या नुकसानामुळे अधिकच संकटात सापडले आहेत. मात्र याकडे कुणी फारसे लक्ष देताना दिसत नाही. विमा कंपन्या याचा गैरफायदा घेत असून, डोळ्यांदेखत झालेले नुकसान दिसत असून देखील नुकसान भरपाई देण्यास अवास्तव कारणे देऊन टाळाटाळ करीत आहेत.
पुढे बोलताना संभाजीराजे म्हणाले की, शेतकऱ्यांबरोबरच व्यापारी वर्ग हा राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा असतो. व्यापारास संरक्षण व उत्तेजन दिले, तरच अर्थव्यवस्था मजबूत होऊन राष्ट्राचा विकास साधला जातो, असे सांगत, या पूरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना, वाहन धारकांना केवळ शासकीय मदत जाहीर करून न थांबता, त्यांच्या झालेल्या नुकसानाची योग्य तितकी भरपाई विमा कंपन्यांकडून करण्यात यावी, यासाठी शासनाने यामध्ये लक्ष घालणे गरजेचे आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्यात मी प्रयत्नशील राहीन, असे आश्वासन देत विमा कंपन्यांनी योग्य तितकी नुकसान भरपाई तातडीने न दिल्यास माझ्याशी गाठ राहील, असा सज्जड इशाराही संभाजीराजे यांनी यावेळी दिला.