वारकरी संप्रदायातील कार्याबद्दल ९५ वर्षीय ज्येष्ठ वारकरी गुंडू नलवडे यांचा सत्कार
करवीर :
वयाच्या ९५ व्या वर्षीही नित्यनियमाने दररोज गावातील विठ्ठल मंदिरात होणाऱ्या सर्व कार्यक्रमात सावर्डे दुमाला (ता.करवीर) येथील गुंडू बाळू नलवडे हे सक्रिय सहभागी असतात. त्यामुळे वारकरी संप्रदायातील प्रदीर्घ सहभागाबद्दल ज्येष्ठ वारकरी नलवडे यांचा सत्कार करवीरचे माजी सभापती पांडुरंग पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व भिकाजी भोसले कांचनवाडीकर यांचे हस्ते फेटा, शाल देऊन करण्यात आला.
सावर्डे दुमाला येथे ह.भ.प. गुरुवर्य कै. आप्पासो वास्कर महाराज या प्रेरणेने विठ्ठल मंदिरात
वारकरी सांप्रदायाचे कार्य सुरू आहे. नुकताच ज्ञानेश्वरी पारायण सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थित पार पडला. मंदिरातील काकड आरती, सायंकाळी हरिपाठ , भजन अशा सर्व कार्यक्रमात गुंडू नलवडे यांचा वयाच्या ९५ व्या वर्षीही असलेला सक्रिय सहभाग हा वारकऱ्यांसह भाविकांना नवी ऊर्जा देणारा आहे. या वयातही ते भजनाला एक एक तास उभे राहतात. वारकरी संप्रदायातील त्यांच्या या सहभागाबद्दल वारकऱ्यांच्या वतीने यथोचित असा सत्कार करण्यात आला.
यावेळी शंकर निकम, भिकाजी सुर्वे, आनंदा भोसले, रघुनाथ कारंडे, नानासो कारंडे, पिराजी मोहिते, भिकाजी कांबळे, मदन कारंडे, पांडुरंग कारंडे यांच्यासह वारकरी उपस्थित होते.