असा सूचक इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
दिला
कोल्हापूर :
पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा मोठा तडाखा बसला. मोठ्या प्रमाणवार जीवित आणि वित्तहानी झाली. कोल्हापुरात २०१९ नंतर पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे हजारो नागरिकांचे संसार पाण्यात वाहून गेले. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरच्या पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला.
यानंतर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी या परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असा सूचक इशारा दिला आहे. नदीपात्रातील अतिक्रमण हे देखील महत्त्वाचं कारण सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बोलत होते.
काही कठोर निर्णय आपल्याला घ्यावे लागतील. ते नाही घेतले, तर हे संकट आपली पाठ सोडणार नाही. जे काही करता येणं शक्य आहे, ते आपण करू शकतो. आत्ताच ते शक्य आहे. नदी पात्रात झालेली अतिक्रमणांबाबत मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, यापुढे आता बांधकामं करता येणार नाही. नाहीतर ब्लू लाईन, रेड लाईन या रेषा मारूच नका. मग जे व्हायचं, ते होऊ द्या. पण असं आपल्याला करता येणार नाही. त्यावर कायमस्वरूपी इलाज करणं हा महत्त्वाचा भाग आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
अतिरिक्त पाण्याचं नियोजन करणं महत्त्वाचं आहे. त्याचा आराखडा बनवून काम सुरू करावं लागेल. कोसळणाऱ्या दरडी, खचणारे रस्ते यांचाही अभ्यास करावा लागेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातत्याने पूरबाधित भागातील नागरिकांचं पुनर्वसन करणं ही बाब आहे. दरड कोसळण्याची शक्यता आहे, अशा गावांचंही पुनर्वसन करावं लागणार आहे”, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं.