पूरग्रस्तांना मदत : राज्य सरकारकडून तातडीची दहा हजारांची रोख मदत
मुंबई :
राज्यातील
पूरग्रस्तांना राज्य सरकारकडून तातडीचे मदत म्हणून घरात पाणी शिरलेल्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये देण्याचं जाहीर केले आहे. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली . तसेच, अन्नधान्यांचं नुकसान झालेल्यांना पाच हजार रुपयांची तत्काळ मदत देण्यात येणार आहे. प्रति कुटुंब दहा हजार रुपयांची मदत पूरग्रस्तांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. पुरामध्ये जी घरं गेली किंवा घरात पुराचं पाणी शिरले आहे, त्या सगळ्या ठिकाणी सर्व कुटुंबास दहा हजार रुपये नगदी रुपाने व पाच हजार धान्य रुपाने ही मदत देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे व मदत देणार आहोतच.असं वडेट्टीवार म्हणाले आहेत.
पूर्णपणे घर पडलं असेल त्याला देखील मदत दिली जाणार आहे. ज्यांचा मृत्यू झाला असेल, त्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेली आहे. यातील एक लाख रुपये मुख्यमंत्री निधीतून व चार लाख रुपये एसडीआरएफमधून असे संपूर्ण पाच लाख रुपये महाराष्ट्र सरकारकडून संबंधित कुटुंबास दिले जाईल. असे वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे .
नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत केली जाईल. मदत पुरवठा होताना कोणत्याही तांत्रिक अडचणी येऊ देणार नाही.जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना तशा सूचना देखील दिल्या गेल्या आहेत. एकदा संपूर्ण आढावा आला की, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणचा सगळा एकत्रित आढावा घेऊन आर्थिक मदत देखील दिली जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जाहीर केलं होतं. चिपळूण येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्थानिक प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली व यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.
दोन-चार दिवसांमध्ये राज्यातील पूरपरिस्थितीतील नुकसानीचा आर्थिक आढावा घेण्यात येईल, मात्र आत्ता लगेच तातडीची मदत म्हणून अन्न, औषध, कपडेलत्ते व इतर आवश्यक गोष्टी पूरग्रस्तांना तत्काळ देण्याबाबत संबंधित जिल्हाधिकार्यांना निर्देश दिले आहेत.
राज्यात मागील काही दिवसांमध्ये मुसळधार पावासाने थैमान घातलं आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळून, पूर येऊन घडलेल्या दुर्घटनांमध्ये नागरिकांना जीव गमावावा लागला आहे. तर, अद्यापही अनेक गावं व काही शहरांना पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. अतिवृष्टीमुळे कित्येकांचे संसार उघड्यावर आले तर, बरेच जण बेघर देखील झाले आहेत. पुराच्या पाण्यात घरातील वस्तूंसह व्यापाऱ्यांचा दुकानातील माल वाहून गेल्याने नागरिक हतबल झाले आहेत.