गुरुदत्त शुगर्स चे महापूरातील जनावरांच्या छावणीचे कार्य कौतुकास्पद
चेअरमन-विश्वास पाटील
कोल्हापूरः२६:
गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महापूराने थैमान घातले असून, गावातील लोकांना जनावरांसह स्थलांतरीत करणेत आलेले आहे. महापुराने शिरोळ तालुक्यातील अनेक लोकांचे व जनावरांच मोठे हाल झाले आहे. पण गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे यांनी सामाजिक बांधिलकेच्या भावणेतून कार्य स्थळावर छावणी उभा करून १८०० पूरग्रस्तांना व त्यांच्या ७०० जनावरांना मोठ आधार दिला आहे. पूरग्रस्तांच्या मुक्या जनावरांना स्वतःच्या ३५ एकर शेतातील ऊस चारा देऊन पशुवैदयकिय सेवा देखील उपलब्ध करून कौतुकास्पद कार्य केले असल्याचे प्रतिपादन गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी केले.
गोकुळ कडून आज गुरुदत्त शुगर्स च्या छावणीला दहा टन पशुखाद्य देण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. तसेच त्या भागातील सैनिक टाकळी,नवे दानवाड, दत्तवाड, या गावातील जनावरांच्या छावण्यांना भेट दिली.
पुढे बोलताना श्री.पाटील म्हणाले कि जिल्ह्यातील जनावरांच्या औषध उपचारांकरीता संघाच्या दहा डॉक्टरांचे पथक तयार केले असून ती सेवा चोवीस तास चालु असून महापूरात व महापूरानंतर जनावरांना रोगराई होवू नये यासाठीही पूरग्रस्त भागांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून संघाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत इतर सर्व खबरदारी युध्दपातळीवर घेणेत येत आहे.
यावेळी बोलताना जेष्ठ संचालक अरुण डोंगळे म्हणाले महापुराने अनेक मुक्या जनावरांना गुरुदत्त शुगर्स ने दिलेला आधार हा मोलाचा आहे. शासनाची कोणत्याही प्रकारची मदत न घेता माधवराव घाटगे यांनी पूरग्रस्तासाठी केलेले कार्य अस्मरणीय असून त्यांची जिल्ह्यातील अनेक संस्थांनी दखल घेण्यायोग्य आहे. कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी विकास चौगले यांनी पूरग्रस्त छावणीच्या कामाची माहिती दिली.
यावेळी गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील (आबाजी), संघाचे माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक अजित नरके, शशिकांत पाटील-चुयेकर, प्रकाश पाटील, डॉ.सुजित मिणचेकर, गुरुदत्त शुगर्सचे संचालक बबनराव चौगुले, संजय गायकवाड,उमेश पाटील (टाकळीकर) गोकुळचे जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, जनसंपर्क अधिकारी विकास चौगले आदि उपस्थित होते.