कोल्हापूर जिल्ह्यात महापुराचा धोका : एनडीआरएफच्या दोन पथकांना पाचारण
Tim Global
कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे धरण व नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ होऊ लागली असून आज नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. पूर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन एनडीआरएफची दोन पथकांना पाचारण केले आहे. पुण्याहून ही पथके निघाली असून दुपारपर्यंत दाखल होतील.
कोल्हापूर जिल्ह्याला गेल्या दोन दिवसांपासून पावसाने झोडपून काढलं असून गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड, आजरा या तालुक्यात संततधार सुरू आहे. राधानगरी, काळम्मावाडी, चांदोली या धरणातील पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ झाली आहे . पंचगंगा नदीची पाणीपातळी आज सकाळी सात वाजता ३५ फूट होती. इशारा पातळी ३९ फूट आहे. पावसाचा जोर पाहता आज सायंकाळपर्यंत पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने कोल्हापूर जिल्ह्यात चार दिवस रेड अलर्ट दिला आहे. प्रशासनाने ही सावधानतेचा इशारा दिला आहे. महापुराची संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन सावधगिरीचा उपाय म्हणून एनडीआरएफच्या पथकांना पाचारण करण्यात आले आहे. आज सकाळी आठ वाजता पुणे येथून दोन पथके कोल्हापूरसाठी रवाना झाली असल्याचे एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तर कोल्हापूर जिल्ह्यातील संभाव्य महापूर परिस्थिती लक्षात घेऊन १५ ऑगस्टपर्यंत या पथकांना कोल्हापुरात तैनात करण्याचे नियोजन केले होते. शासनाने आज पथक पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. एक पथक कोल्हापुरात असेल तर दुसरे महापुराचा अधिक धोका असलेल्या शिरोळ तालुक्यात असेल, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांनी सांगितले आहे.
वाहतूक बंद…
जिल्ह्यातील अनेक प्रमुख मार्ग पावसामुळे बंद झाले आहेत. कोकणाकडे जाणाऱ्या गगनबावडा येथील मार्ग बंद करण्यात आला आहे. तसेच रत्नागिरीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. जिल्ह्यातील अनेक नद्यांचे पाणी पुलावर आल्याने स्थानिक पातळीवरची वाहतूक बंद करण्यात आली आहे.ती वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
कोल्हापूर गगनबावडा मार्गावर….
दोनवडे येथे भोगावती नदीचे पुराचे पाणी रस्स्यावर येण्यासाठी सुमारे १२ फूट (उभी उंची)
गाठावी लागेल, दोन दिवस संततधार पाऊस झाल्यास या ठिकाणी रस्ता वाहतुकीस बंद होईल अशी परस्थिती आहे.
हे मार्ग बंद….
महे (ता करवीर) सावरवाडी वाहतुक बंद,पन्हाळा तालुक्यातील माजगाव पोर्ले बंद, गडहिंग्लज तालुक्यामध्ये नीलजी व एनापुर हे दोन बंधारे पाणी आल्यामुळे वाहतुकीसाठी बंद ,गडहिंग्लज चंदगड राजमार्ग वर दुपारी पर्यंत पाणी येण्याची शक्यता,शाहुवाडी तालुक्यातील गेळवडे धरणातील पाण्याचा विसर्ग सुर केलेने कासारी नदीच्या पाणी पात्रात वाढ झालेने बर्की गावात जाणारे पुलावर पाणी आले , बर्की गावचा संपर्क तुटला आहे. अणुस्करा मार्गे पाय वाट सुरू,
मलकापूर ते रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग वर येल्लुर गावाजवळ पाणी आल्याने महामार्ग बंद.