आषाढी एकादशी : मुख्यमंत्री यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा पार पडली
पंढरपूर :
पंढरपूर , अखंड महाराष्ट्राचं अराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूरच्या विठुरायाचरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्नीक नतमस्तक झाले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या गाभाऱ्यात शासकीय महापूजा पार पडली.
करोनाचं संकट गडद होण्याची भीती असल्याने सरकारने यंदाही पायी वारीला परवानगी नाकारली होती,मात्र प्रतिनिधीक स्वरूपात मानाच्या दहा दिंड्यांना परवानगी देण्यात आली . पुष्पांनी सजलेल्या शिवशाही बसेसमधून संतांच्या पालख्या भूवैकुंठी दाखल झाल्या होत्या.
लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडणारा आषाढी एकादशीचा सोहळा करोनाच्या संकटामुळे यंदा सलग दुसऱ्या वर्षी मोजक्या उपस्थितीत पार पडला. करोनामुळे विविध नियम बंधनांमध्येच मागील वर्षीप्रमाणे यंदाही पंढरपुरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते मोजक्या लोकांच्या हजेरीत विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. मुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मानाचे वारकरी आणि ठराविक पुजारी यांच्या उपस्थितीत ही शासकीय पूजा पार पडली.
यंदा मुख्यमंत्र्यांसोबत कोलते दांपत्याने केली पूजा…
यंदा मुख्यमंत्र्यांसोबत कोलते दांपत्याने विठ्ठल रुक्मिणीची महापूजा केली. केशव शिवदास कोलते (७१) व इंदूबाई केशव कोलते (६६) (रा. संत तुकाराम मठ, वर्धा) यांना यंदाच्या महापूजेचा मान मिळाला. केशव कोलते हे गेल्या वीस वर्षांपासून एकटेच पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरात २४ तास वीणा वाजवून सेवा करीत आहे. त्यांच्या पत्नी इंदूबाई व मुलगा ओमप्रकाश कोलते हे वर्ध्यातील घरी राहतात. त्यांना चंदा आणि नंदा नावाच्या दोन मुलीही आहेत. ते वीस वर्षांपासून माऊलींच्या सेवेत आहेत. पंढरपूर देवस्थान समितीचे सह अध्यक्ष गहणीनाथ महाराज औसेकर, सदस्य शकुंतला नडगिरे, ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, प्रकाश जवंजाळ, कार्यकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी मानाचा वारकरी म्हणून त्यांची निवड केली होती.