कोल्हापूर :
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. शिकाऊ, उमेदवारी भरती करून जास्तीत-जास्त आस्थापनांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मुंडासे आर.एस. यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या शिकाऊ उमेदवारांना देय विद्यावेतनाच्या 75 टक्के किंवा जास्तीत-जास्त 5 हजार रू. यापैकी कमी असलेले विद्यावेतन शिकाऊ उमेदवारांना शासनातर्फे अनुज्ञेय राहील.
शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजनेंतर्गत 27 गटातील 258 निर्देशित, 35 गटातील 414 वैकल्पिक, 6 गटातील 20 तंत्रज्ञ (व्यावसायिक) आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास परीक्षा मंडळाचे 123 व्यवसाय महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेसाठी समाविष्ट राहतील.
जिल्ह्यामध्ये एकूण 760 आस्थापनामध्ये 1900 उमेदवार हे ॲपेटिशिप टेनिंग स्किम या योजनेमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेंतर्गत संबंधित आस्थापनांनी नोंदणी केल्यास त्यांचा विद्यावेतनावर होणारा खर्च कमी होणार आहे. तसेच योजनेचा लाभ सद्या 34 आस्थापना घेत आहेत. त्यांनाही महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेचा लाभ घेता येईल. मुलभूत प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांनाही या योजनेचा लाभ घेता येईल.