मुंबई :
करोना रुग्णसंख्या कमी झालेल्या भागांत दुकानांच्या वेळा वाढविण्यासह निर्बंध शिथिल करण्याची मंत्र्यांची, मंत्रिमंडळाच्या बैठकीतील मागणी मुख्यमंत्र्यांनी बुधवारी अमान्य केली. रुग्णसंख्येत अपेक्षित घट झालेली नसून, संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका, आणि गर्दी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध कायम राहतील, असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
राज्यात करोनामुळे लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल करावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे. विशेष करून दुकानांच्या वेळा वाढवाव्यात, अशी मागणी व्यापारी संघटनांनी केली आहे. त्याचे पडसाद बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले. सध्या सकाळी ७ ते सायंकाळी ४ पर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी आहे. याशिवाय अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने शनिवार-रविवारी बंद ठेवली जातात. सायंकाळी ७ पर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्याची मागणी व्यापारी करत आहेत. रुग्णसंख्या कमी असलेल्या जिल्ह्य़ांमध्ये तरी सायंकाळी ७ पर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्याची मागणी काही मंत्र्यांनी केली आहे.
या बैठकीत करोना परिस्थितीवर आरोग्य विभागाच्या वतीने सादरीकरण करण्यात आले. राज्यातील बहुतांश भागांत करोना रुग्णसंख्या कमी झाली असली, तरी १० जिल्ह्य़ांत रुग्णसंख्या जास्त आहे. गेल्या काही आठवडय़ांपासून राज्यातील करोना रुग्णांचा दैनंदिन आलेख हा ७ ते ८ हजारांच्या दरम्यान स्थिरावला आहे. पण तो ५ हजारांपेक्षा कमी होणे अपेक्षित असताना तसे होऊ शकलेले नाही, याकडे लक्ष वेधण्यात आले. तसेच तिसऱ्या लाटेच्या धोक्याबाबत इशारा देण्यात आल्याकडेही लक्ष वेधण्यात आले. या पार्श्वभूमीवर दुकांनाची वेळ वाढवण्याबाबत मागणी असली तरी तूर्त निर्बंध कायम राहतील, असे संकेत देण्यात आले.
महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश व तमिळनाडू या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १६ जुलैला करोनाविषयक बैठक घेणार आहेत. करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे. त्यामुळे त्या बैठकीआधी राज्यात निर्बंध शिथिलीकरणाबाबत निर्णय होण्याचा प्रश्नच येत नाही. त्या बैठकीनंतर पुढील दिशा स्पष्ट होईल, असे सांगण्यात आले.
करोनाचा धोका पाहता राज्यात निर्बंध शिथिल करण्याचा कोणताही निर्णय मंत्रिमंडळाने घेतला नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. देशात करोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र, ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. कमी रुग्णसंख्या असलेल्या भागांत दुकाने दुपारी ४ ऐवजी सायंकाळी ७ पर्यंत सुरू करण्याची मागणी आहे. मात्र, राज्यातील एकं दर करोनास्थिती पाहता निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय झालेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात करोनाचे ८,६०२ नवे रुग्ण
राज्यात बुधवारी करोनाचे ८,६०२ रुग्ण आढळले असून, १७० रुग्णांचा मृत्यू झाला. मंगळवारच्या तुलनेत रुग्णसंख्येत एक हजाराची वाढ नोंदवण्यात आली. राज्यात एक लाख सहा हजार ७६४ उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईत बुधवारी ६३५, अहमदनगर ४७७, पुणे ग्रामीण ६११, पुणे मनपा ३५८, पिंपरी-चिंचवड २१९, सोलापूर ५८५, सातारा ६८१, कोल्हापूर १३७६, सांगली ७६२, सिंधुदुर्ग २३१, रत्नागिरी ३२९ रुग्ण आढळले.
नगर, बीड, पालघर, सोलापूरमध्ये पुन्हा फैलाव
राज्याच्या रुग्णवाढीच्या दरापेक्षा अधिक रुग्णवाढीच्या जिल्ह्यंमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्य़ांबरोबरच आता सोलापूर, पालघर, बीड आणि अहमदनगर या नव्या जिल्ह्य़ांची भर पडली आहे. राज्याच्या १० जिल्ह्य़ांत ९२ टक्के रुग्णसंख्या आहे. अन्य २६ जिल्ह्य़ांत ८ टक्के रुग्ण आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
लसधोरण बदलण्याची मागणी
सध्या जिल्ह्य़ांना लोकसंख्येच्या प्रमाणात लशींचा पुरवठा केला जातो. परंतु रुग्णसंख्या जास्त असलेल्या जिल्ह्य़ांना लशींच्या पुरवठय़ात प्राधान्य द्यावे, अशी मागणी मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली. राज्याला लशींचा पुरेसा पुरवठा होत नाही, याकडे आरोग्य विभागाने लक्ष वेधले.
नियमभंगप्रकरणी कारवाईची केंद्राची सूचना
नवी दिल्ली : बाजारपेठा, पर्यटनस्थळी करोना नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. त्यामुळे नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केली. वाहतुकीदरम्यान गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.