मुंबई :
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रीय झाला आहे. पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार व अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पुढील ३ तासांत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पुणे, साताऱ्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र पुन्हा निर्माण झाल्याने मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती तयार झाली आहे. नैऋत्य मोसमी वारे पुन्हा सक्रिय झाल्याने २० दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावली. पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने सोमवारपासून पुढील ५ दिवस कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. राज्यात रविवार दुपारपासूनच पावसाने जोरदार पाऊस कोसळत आहे. कोकणासह बुलढाणा, अकोला, नांदेड, परभणीमध्ये पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. कुडाळ, कणकवली, वेंगुर्ले, सावंतवाडी, दोडामार्गमध्ये मुसळधार तर देवगड, वैभववाडीत संततधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण सरासरी १३२३.९१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
रायगड जिल्ह्यात सोमवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाचा तडाखा बसला असून, सरासरी ८८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुरुड तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, तालुक्यात २४ तासांत तब्बल ३४८ मिलीमीटर पाऊस पडला. अतिवृष्टीमुळे काशिद येथे पूल वाहून गेला असून, या दुर्घटनेत एक वाहन चालक वाहून गेला आहे. त्याचबरोबर राजपूरी आणि कळवटे येथे दरड कोसळल्याची घटना घडली आहे. तर उसरोली नदीलाही पूर आल्याने सुपेगाव मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढल्याने प्रमुख नद्यांमध्ये पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे. दक्षिण कोकणात पुढील दोन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.