मुंबई :
राज्यातील कोविडमुक्त ग्रामीण भागातील पहिल्या टप्यात शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये
इयत्ता आठवी ते इयत्ता १२ वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या . आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात आली, यामध्ये विद्यार्थी शाळेत येण्यासाठी बॅक टू स्कूल मोहीम राबवण्याची सूचना करण्यात आली आहे.यासाठी गावस्तरावर समिती स्थापना करणे आवश्यक असून, शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची लेखी परवानगी आवश्यक असणार आहे.

यासंदर्भात काढलेल्या शासन परिपत्रकात , १५ जुलै २०२१ पासून राज्यातील कोविडमुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात येत असून ग्रामपंचायतीनी ठराव करून खालील निकषांच्या आधारे पहिल्या टप्प्यात शाळेतील इयत्ता आठवी ते बारावी चे वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
ग्रामीण भागात, कोविडमुक्त गावात ग्रामपंचायतीने त्यांच्या अखत्यारीत असणारे गावातील शाळेतील इयत्ता आठवी ते बारावी चे वर्ग सुरू करणेबाबत पालकांशी चर्चा करून ठराव करावा. ग्रामपंचायत स्तरावर सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली खालील प्रमाणे समिती गठीत करावी. समितीचे अध्यक्ष हे सरपंच असतील, सदस्यांमध्ये तलाठी व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, मुख्यध्यापक व केंद्रप्रमुख, निमंत्रित सदस्यांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचा वैद्यकीय अधिकारी, सदस्य सचिव म्हणून ग्रामसेवक असणार आहेत.
समितीने शाळा सुरू करण्यापूर्वी या बाबीवर चर्चा करावी -शाळा सुरू करण्यापूर्वी कमीत कमी १ महिना संबंधित गावात कोविड रूग्ण आढळून आला नसावा.
शिक्षकांच लसीकरण प्राधान्याने करणे बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व शिक्षण अधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करावा.
विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शालेय परिसरात प्रवेश देऊ नये.
विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तत्काळ शाळा बंद करून शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करून घ्यावी व विद्यार्थ्याचे विलगीकरण करावे व वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने वैद्यकीय उपचार करावेत.
राज्यात कोविडमुक्त क्षेत्रातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी….
शाळा सुरू , करताना मुलांना टप्या-टप्यात शाळेत बोलाविण्यात यावे. कोविडिसंबंधी सर्व नियामांचे काटेकोरपणे पालन करावे.
एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये सहा फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५-२० विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवणे व लगेच करोना चाचणी करून घेणे .
संबंधित शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करावी किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी शिक्षणाधिकारी, आरोग्य अधिकारी यांच्या समवेत सातत्याने आढावा घेऊन आवश्यक तेथे सूचना कराव्यात.