पालकमंत्री सतेज पाटील
कोल्हापूर :
जिल्ह्यातील 45 वर्षांवरील नागरीकांच्या लसीकरणासाठी 6 जुलै 2021 रोजी 62 हजार 500 कोविशिल्ड लसींचे डोस उपलब्ध झाले आहेत. यामध्ये दुसरा डोस राहिलेल्या पात्र नागरिकांना प्राधान्याने लस देण्यात येणार आहे . कोल्हापूर जिल्हा आरोग्य विभागाच्या माध्यमातून कोल्हापूर शहर तसेच सर्व तालुक्यांना त्या तालुक्यातील 45 वर्षांवरील लस न घेतलेल्या नागरीकांच्या संख्येवरुन तालुकानिहाय लसींचा कोटा ठरविण्यात आला आहे. शासनाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील नागरीकांना लस उपलब्ध करुन देण्यासाठी माझ्यासह ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर असे आम्ही जिल्ह्यातील तीन ही मंत्री सातत्याने प्रयत्नशील असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
याबाबत माहिती देताना पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले की, सद्या 45 वर्षांवरील नागरीकांना प्राधान्याने लस देण्याचे नियोजन शासनाने केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 45 वर्षावरील नागरीकांची संख्या 12 लाख 74 हजार 549 इतकी आहे. सोमवार दि.05 जुलै अखेर यामधील 8 लाख 54 हजार 414 नागरीकांना पहिला डोस दिला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या माध्यमातून राज्य शासनाकडून मिळालेल्या लसींचे वाटप करण्यात येते. यामध्ये शहरातील नागरीकांसाठी ऑनलाईन तर ग्रामीण भागातील लोकांना ऑफलाईन पध्दतीने लसीसाठी नोंदणी केली जाते. ग्रामीण भागात ऑनलाईन नोंदणीची अडचण लक्षात घेवून उपलब्ध लसींचा कोटा पाहून लोकांना लसीकरणासाठी कुपन दिले जातात. गेले काही दिवस जिल्ह्याला कमी प्रमाणात लस उपलब्ध झाली हे वास्तव आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या लक्षात घेवून जिल्ह्यासाठी जास्तीतजास्त लसींचे डोस उपलब्ध होण्यासाठी आम्ही जिल्यातील तीन मंत्री प्रयत्न करत आहोत.
दि.6 जुलै रोजी जिल्ह्यासाठी 62 हजार 500 कोविशिल्ड लसींचे डोस उपलब्ध झाले असून जिल्हा आरोग्य विभागाच्या माध्यमातून कोल्हापूर शहर तसेच 12 तालुक्यांना लसींचा कोटा उपलब्ध करुन दिला आहे. हा कोटा ठरविताना त्या तालुक्यातील 45 वर्षांवरील लस न घेतलेल्या नागरीकांची संख्या विचारात घेतली जाते.
या लसींमूधन जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज लसीकरण झाले .
कोल्हापूर शहरात कोव्हॅक्सिन
लसीचे लसीकरण करण्याचे नियोजन बुधवार दिनांक 7 रोजी महापालिकेने केले आहे. त्यामुळे या कोविशील्ड डोससाठी कोल्हापूर शहरात उद्या ऑनलाईन बुकींग करुन गुरूवारी (8 जुलै) कोविशील्ड डोसचे लसीकरण केंद्रावर लस देण्यात येणार आहे.
तालुका व शहर उपलब्ध झालेला कोटा..
आजरा -2500
भुदरगड -3100
चंदगड -3800
गडहिंग्लज – 4470
गगनबावडा – 700
हातकणंगले – 11 हजार 100
कागल – 4500
करवीर – 6860
पन्हाळा – 3960
राधानगरी – 3840
शाहूवाडी – 3550
शिरोळ – 6250
सीपीआर रुग्णालय – 300
सेवा रुग्णालय, बावडा- 500
कोल्हापूर महानगरपालिका – 7070