लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई

कोल्हापूर :

अवसायनातील संस्थेच्या जमिनीचे शासकीय मूल्यांकन करून देण्यासाठी ४५ लाखाची मागणी करून २० लाखाचा पहिला हप्ता स्वीकारताना मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील मुद्रांक जिल्हाधिकारी सहजिल्हा निबंधक कार्यालयातील सहाय्यक रचनाकार गणेश हनमंत माने (वर्ग २ अधिकारी) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.

यातील तक्रारदार हे सुतगिरणीचे अध्यक्ष आहेत. ही संस्था शासनाने अवसायनात काढल्याने अवसायक यांनी सुतगिरणीची नोंदणी रद्द करण्याची असल्याने त्याकरिता संस्थेच्या जमिनीचे शासकीय मूल्यांकन करून दाखला देण्यासाठी मुद्रांक जिल्हाधिकारी यांना पत्र दिले होते.

मालमत्तेचे मूल्यांकन लवकर करून दाखला‍ मिळावा म्हणून तक्रारदार सहाय्यक रचनाकार गणेश माने यांना वेळोवेळी भेटले होते. २१ जानेवारी २०२१ रोजी मालमत्तेचे मूल्यांकन करून लवकरात लवकर दाखल देण्याची तक्रारदारने विनंती केली असता श्री. माने यांनी मूल्यांकन करून दाखला द्यायचा असेल तर ४५ लाख रूपये द्यावे लागतील असे सांगितले. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रार अर्ज दिला.
२१ जानेवारी व १ फेब्रुवारी रोजी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील श्री. माने याच्या लाच मागणीची पडताळणी पंच साक्षीदारांच्या समक्ष करण्यात आली. पडताळणीमध्ये मालमत्तेचे शासकीय मूल्यांकन करून दाखला देण्यासाठी ४५ लाख रूपये लाचेची मागणी श्री. माने याने करून पहिला हप्ता २० लाख रूपये घेऊन येण्यास सांगून राहिलेले २५ लाख रूपये दाखला देताना घेऊन येण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले.

आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मध्यवर्ती प्रशासकीय इमारती मधील मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात सापळा लावला असता तक्रारदार व गणेश माने हे दोघेजण कार्यालयातून बाहेर पडून आवारातील चहाच्या टपरीवर गेले व त्या ठिकाणी तक्रारदाराकडून २० लाख रूपये लाच स्वीकारताना पथकाने पकडले.

ही कारवाई पोलीस उपायुक्त राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनानुसार पेालीस उपअधीक्षक अदिनाथ बुधवंत, पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत, सहाय्यक फौजदार संजू बंबर्गेकर, पोलीस हवालदार शरद पोरे, पोलीस नाईक नवनाथ कदम, सुनील घोसाळकर, मयुर देसाई, चालक सुरज अपराध यांच्या पथकाने केली.
लाचेच्या अथवा अपसंपदेबाबत तक्रारी असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्र. 1800222021, 02026122134,26132802, 26050423 वर संपर्क साधावा, असे  आवाहन करण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!