वसंतराव मुळीक व इंद्रजीत सावंत यांची भावना : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा मराठा समाज व संघटनांकडून सत्कार
कोल्हापूर :

सहा जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन यापुढे शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करावयाचा ग्रामविकास विभागाचा निर्णय ऐतिहासिक व क्रांतिकारक असल्याचे गौरवोद्गार वसंतराव मुळीक व इंद्रजीत सावंत यांनी काढले या कृतज्ञतेच्या भावनेतून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार सकल मराठा समाज व मराठा संघटनांनी कोल्हापुरात केला.
यावेळी मराठा स्वराज्य ट्रस्ट,अखिल भारतीय मराठा महासंघ व सकल मराठा समाज तसेच इतर संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुजनांच्या उध्दारासाठी उभी हयात खर्ची घातली, या निर्णयामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र पिढ्यानपिढ्या चिरंतन राहील.
यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतलेल्या या क्रांतिकारी निर्णयामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचा हा उत्सव खऱ्या अर्थाने लोकोत्सव होणार आहे. हा उत्सव शहरांसह गावा-गावात आणि घरा-घरात जाणार आहे. मंत्री मुश्रीफ यांच्या या कार्याची नोंद घेऊन कोल्हापुरात हा राज्यस्तरीय सत्कार सोहळा आयोजित करावयाचा होता, परंतु कोरोना महामारीमुळे तो प्रातिनिधिक स्वरूपात करीत आहोत.
इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्वराज्य दिनाचा हा ऐतिहासिक व क्रांतिकारक निर्णय ही साधी सोपी गोष्ट नाही, हा निर्णय हसन मुश्रीफ यांच्यासारख्या एका मावळ्याने घ्यावा, हि आम्हा कोल्हापूरकरांसह तमाम महाराष्ट्रवासीयांना अभिमानास्पद बाब आहे.
चौकट
जीवाला जीव देणारी माणसं…….
मंत्री मुश्रीफ म्हणाले, स्वराज्याच्या निर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी विविध जाती-धर्मातील मावळ्यांचे केलेले संघटन कौतुकास्पद आहे. एका ध्येयाने प्रेरित होऊन जिवाला जीव देणारी माणसं कशा प्रकारे एकत्र केली जाऊ शकतात, याचेच हे मूर्तिमंत उदाहरण आहे.
यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष गुलाबराव घोरपडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, बैतुलमाल कमिटीचे बाबा जाफर, कादर मलबारी, शशिकांत पाटील, प्रकाश पाटील, सुनील पाटील, शिवाजी वारके, गोपाळ पाटील, अमित अडसूळ, दीपक मुळीक, नितीन दिंडे, अवधूत पाटील, मधुकर पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.