एकजुटीने कोरोना विरुध्दची लढाई जिंकूया

पालकमंत्री सतेज पाटील यांचे आवाहन

कोल्हापूर :

गट-तट, पक्षीय मतभेद बाजूला ठेवून माणुसकी म्हणून कोरोना विरुद्धची लढाई आपल्याला जिंकायची आहे. या कठीण परीस्थितीमध्ये आपल्या सर्वांची साथ मिळणे आवश्यक आहे.  कोल्हापूरने आज पर्यंत अशा अनेक लढाया खंबीरपणे लढलेल्या आहेत आणि जिंकल्या आहेत. एकजुटीने कोरोना विरुध्दची लढाई आपण जिंकूया असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.
कोरोना दुसरी लाट आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सद्यस्थिती या विषयावर  फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी कोल्हापूरकरांशी संवाद साधला. लसीकरण, रेमडीसीवर उपलब्धता, कोल्हापूरचा मृत्यू दर, बेडची उपलब्धता, ऑक्सीजन उपलब्धता, टेस्टिंग, याबाबत त्यांनी आकडेवारीसह सविस्तर मुद्दे मांडले.

यावेळी बोलताना त्यांनी सांगीतले की, कोरोनाच्या या लाटेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय आपल्यासमोर आहे तो म्हणजे ,लसीकरणाचा,
आपण सर्वजण लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी करायचा प्रयत्न करतो पण ही नोंदणी फुल झालेली असते, एखाद्या आरोग्य केंद्रावर लस घ्यायला गेलो त्या ठिकाणी लस संपलेली असते या सर्व गोष्टी आपल्या मनात आहेत हे मी जाणतो. पण यातील वस्तुस्थिती म्हणजे ,कोणत्या राज्याला किती लस पुरवठा करायचा याची सर्व नियंत्रण हे केंद्र शासनाच्या वतीने केले जाते* कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम करून ,दहा लाखांहून अधिक नागरिकांचे पहिल्या डोसचे लसीकरण पूर्ण केलेले आहे.

लसीकरणाचे हे प्रमाण म्हणजे एकूण पात्र लोकसंख्येच्या 62 टक्के आहे. *या लसीकरणा मध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात सर्वात अव्वल म्हणजेच पहिल्या क्रमांकावर आहे.
या टप्प्यावर ४५ वर्षांवरील ज्या नागरिकांनी अद्याप दुसरा डोस घेतलेला नाही, त्यांना प्राधान्याने हा दुसरा डोस देण्याची नियोजन केलेले आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य ,केंद्र आणि सर्व लसीकरण केंद्रे यांच्या माध्यमातून ज्यांनी दुसरा डोस घेऊन जास्त वेळ गेला आहे अशा लोकांना संपर्क करून लवकरात लवकर लसीकरण करून घेण्याबाबत सांगण्यात येत आहे.

60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना लस घेणे सोयीचे व्हावे यासाठी लसीकरण केंद्रावर त्यांच्यासाठी स्वतंत्र रांग असावी अशा सूचना देखील आम्ही दिलेल्या आहेत. उरलेल्या सर्व नागरिकांची लसीकरण लवकरात लवकर पूर्ण  व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोतच. सध्या लसीच्या तुटवड्यामुळे 18 ते 44  या वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण थांबविण्यात आले आहे. तथापि, पुढील काळात या वयोगटासाठीसुद्धा राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे आम्ही कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा चांगल्या प्रकारची काम करण्यासाठी कटिबद्ध आहोत.

कोल्हापूर जिल्ह्याच्या मृत्यू दराबाबत, बोलताना ना. पाटील यांनी सांगितले की, कोल्हापूर मध्ये चांगली सेवा देणारी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल सुरू झाल्यामुळे मेडिकल हब अशी कोल्हापूरची नवी ओळख निर्माण झाली आहे. जानेवारी 2021 पासून आज पर्यंत ,कोल्हापूर जिल्ह्यात 1072 कोरोना बाधितांची मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.यापैकी 163 म्हणजे सुमारे 15 टक्के रुग्ण कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेरील आहेत.

हे रुग्ण सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग इतकेच काय पुणे मुंबई आणि कर्नाटकातील सुद्धा आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना उपचारासाठी आलेल्या या रुग्णांना आपण मानवतेच्या भावनेतून उपचार दिले आहेत.

अजून यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजूनही कोरोना झाल्याचे समजली तरी हॉस्पिटल मध्ये तात्काळ ॲडमिट व्हावे याकडे सुद्धा बऱ्याच नागरिकांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे.
हॉस्पिटल मध्ये ॲडमिट झाल्यानंतर 24 तासात मृत्यू झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे तब्बल 22 टक्के आहे. ॲडमिट झाल्यावर 48  तासाच्या आत  मृत्यू झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे 12 टक्के आहे. याचाच अर्थ ,ॲडमिट होऊन दोन दिवसाच्या आत मृत्यू झालेल्या रुग्णांचे एकूण प्रमाण हे 34 टक्के आहे. त्यामुळे हे रुग्ण जर वेळेत ॲडमिट झाले असते तर त्यांच्यावर योग्य उपचार होऊन त्यांचे प्राण नक्की वाचले असते ही वस्तुस्थिती आहे.

ऑक्सीजन बेड आणि ICU बेड, व्हेंटिलेटर बेड च्याबाबत ,पहिल्या लाटेच्या तुलनेत आयसीयु आणि व्हेंटिलेटर बेडच्या संख्येमध्ये दुप्पट वाढ करण्यात आलेली आहे. कोवीडसाठी 1 मार्च 2021 रोजी 390 ऑक्सीजन बेड उपलब्ध होते. तर आज 2979 ऑक्सीजन बेड वापरात आहेत. 1 मार्च रोजी कोवीडसाठी 77 आयसीयू बेड वापरात होते. सद्या 623 आयसीयू बेड कोवीडसाठी वापरात आहेत. तसेच आज 400  व्हेंटीलेटर कोवीडसाठी वापरात आहेत.

पहिल्या लाटेच्या तुलनेत कोरोनाचा विषाणू अधिक सक्रिय आणि परिणामकारक आहे. त्यामुळे ऑक्सीजन बेड, आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटर बेडमध्ये ॲडमिट होणाऱ्यांची संख्या ही जास्त आहे. हॉस्पिटल मधील रुग्णांना दररोज लागणाऱ्या ऑक्सिजनच्या गरजेची तुलना केली असता या गोष्टी समोर आल्या आहेत.

ऑक्सीजनची वाढती गरज आधिच लक्षात घेवून आपण 18 ऑगस्ट 2020 रोजी सीपीआर रुग्णालयामध्ये 20 हजार लिटर क्षमतेचा ऑक्सीजन टँक कार्यान्वीत केलेला आहे. कोल्हापूरातून गोवा, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा या जिल्ह्यांना आत्तापर्यंत 750 मे. टन ऑक्सीजन पुरविला आहे. आजही गोव्याला 10 मे.टन इतका ऑक्सीजन दररोज पुरविला जातो.

पण भविष्यात वाढणारी गरज लक्षात घेता ‘मिशन ऑक्सीजन’ अंतर्गत जिल्ह्यात 14 ठिकाणी प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहेत. यातून प्रकल्प मधून दररोज 23 मे. टन प्राप्त होणार आहे. प्रतिदिवस अंदाजे 1800 इतके सिलेंडर भरण्याची क्षमता निर्माण होणार आहे. ऑक्सीजनचा अभाव कोल्हापूरमध्ये कधीच निर्माण होवू नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.

आपल्या नातेवाईकांना किंवा जवळच्या मित्रमंडळींना ॲडमिट झाल्यावर रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध व्हावे, यासाठी आपण आटापिटा करत असता,  आपली धावपळ होते, हे मला मान्य आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर 2020 मध्ये कोरोनाचे सर्वाधिक पेशंट असतानासुद्धा हव्या त्या प्रमाणात इंजेक्शन उपलब्ध होते पण आता का नाही?  हा सुद्धा आपल्या मनातील प्रश्न आहे.

याचे उत्तर म्हणजे ,रेमडेसिवर वितरणावर केंद्र सरकारचे असलेले नियंत्रण हेच आहे.. आज पर्यंत आपल्याला दररोज सरासरी तिनशे एवढी इंजेक्शन्स उपलब्ध होत होती. हे प्रमाण वाढविण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करीत आहोत.

लॉकडाऊनच्या या कालावधी मध्ये गरजू लोकांच्या जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण 38 शिवभोजन केंद्रे सुरू असून सध्या दररोज सुमारे 5800 ते 6000 लाभार्थींना मोफत शिवभोजन देण्यात येत आहे. शिवभोजन  योजना सुरू झाल्यापासून जिल्ह्यात 14 लाखांहून अधिक लाभार्थींनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे. या कालावधीमध्ये समाजातील सर्व घटकांची जास्तीत-जास्त काळजी घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.

कोरोना विरुध्दच्या या लढ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ,टेस्टींग त्यासाठी आपण कोल्हापूरातच अत्याधुनिक टेस्टींग लॅब उभा केली आहे. आजही आपण सर्वाधिक टेस्ट करत आहोत. आणि एकूण टेस्ट मधील तब्बल 80 टक्के टेस्ट या आरटीपीसीआर आहेत. टेस्टींगची आकडेवारी जर बघितली तर जानेवारी 2021 मध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण दीड टक्के इतके होते, पण मे 2021 च्या मध्यावर हे प्रमाण जवळपास 30 टक्के एवढे झाले आहे.म्हणजेच वीस पटीने कोरोना बाधित संख्या वाढली आहे, म्हणूनच कडक लॉकडाऊनचा निर्णय घेणे आम्हांला भाग पडले आहे.

पालकमंत्री म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जनता सुखी असावी. उद्योगधंदे त्याचबरोबर हातावर पोट असणाऱ्या लोकांचे काम सुरू रहावे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. असे असले तरी कोरोनाचे हे संकट महाभयंकर असे आहे. या संकटामध्ये जिल्ह्यातील नागरिकांचा जीव वाचविणे या गोष्टीला आमचे प्राधान्य आहे. आणि त्यासाठी लॉकडाऊन हाच पर्याय आहे.

कोरोनाच्या काळात जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर्स, नर्सेस, डॉक्टर्स, पोलीस कर्मचारी ,तसेच प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, सुट्टी न घेता रात्रं दिवस काम करत आहेत, ही कौतुकाची गोष्ट आहे. या सर्वांचे मनोधैर्य कमी होऊ नये याची काळजी आपण सर्व जण घेऊया, अशी मी आपल्याला विनंती करतो.
कोल्हापूरचा पालकमंत्री म्हणून या लढाईत रात्रंदिवस झोकून देऊन आतापर्यंत मी काम  करत आलो आहे. यापूढेही असेच काम करत राहणार असून कोल्हापूरकरांच्या सुरक्षेसाठी राज्य शासन, सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत. कोल्‍हापूरच्या जनतेनेही यासाठी सहकार्य करावे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!