गोकुळच्या चेअरमन पदी विश्वास पाटील (आबाजी) यांची निवड
कोल्हापूर :
गोकुळ दूध संघाच्या झालेल्या निवडणुकीत विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने २१ पैकी १७ जागा जिंकून सत्तांतर घडवून आणले. त्यानंतर चेअरमन पदी पहिल्यांदा कोणाला संधी मिळते याची जिल्हाभर चर्चा सुरू होती. अखेर चेअरमन पदासाठी विश्वास नारायण पाटील उर्फ आबाजी यांच्या नावावरच शिक्कामोर्तब झाल्याने नूतन चेअरमन पदी त्यांची निवड करण्यात आली.

चेअरमन निवडीच्या संदर्भात दुपारी बारा वाजता गोकुळच्या ताराबाई पार्क येथे संचालकांच्या बैठकीत पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा निरोप देण्यात आला. त्यानंतर गोकुळ शिरगाव येथील बैठकीकडे संचालक रवाना झाले. यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी विश्वास पाटील यांची चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. निवडीवेळी संचालकांनी पिवळे फेटे परिधान केले होते.
चेअरमन पदासाठी विश्वास पाटील (आबाजी) व अरुण डोंगळे यांच्यात रस्सीखेच होती. अखेर पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चेअरमन पदाची धुरा विश्वास पाटील यांचेकडेच सोपवली.
निवडीनंतर नूतन चेअरमन विश्वास पाटील आबाजी म्हणाले, दूध उत्पादक सभासदांना जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न केला जाईल. दुधाला दोन रुपये देण्याचा निर्णय लवकरच घेऊ. गोकुळला नव वैभव प्राप्त करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले