मैत्री राजकारकरणापलीकडची : विश्वास पाटील, डोंगळे यांनी घेतली आपटेंची भेट
करवीर :
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्याने प्रचंड टोकाची राजकीय इर्षा अनुभवली. मात्र निकालानंतर राजकारण बाजूला ठेवून विश्वास पाटील (आबाजी) व अरुण डोंगळे यांनी रवींद्र आपटे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस करून राजकारणापलीकडे मैत्रीचे नाते घट्ट असल्याचे दाखवून दिले.
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक (गोकुळ) संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत विरोधी आघाडीने २१ पैकी १७ जागा जिंकून सत्ताधारी पॅनेलचा दारुण पराभव केला. या निवडणुकीत एकमेकांचे सहकारी व मैत्रीचे बंध असणारे पण राजकीय समीकरणे बदलल्याने एकमेकांविरुद्ध लढणारे विरोधी पॅनेलचे प्रमुख चेहरे विश्वास पाटील आबाजी व अरुण डोंगळे हे विजयी झाले तर सत्ताधारी पॅनेलचा प्रमुख चेहरा असलेले रवींद्र आपटे यांचा पराभव झाला.
गोकुळ निवडणुकीच्या रणधुमाळीत एकमेकांविरुद्धच्या आरोप – प्रत्यारोपामुळे जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले होते. वैयक्तिक पातळीवर टीकाटिप्पणीने आरोपांची पातळीही खालावली होती. अत्यंत टोकाच्या भूमिकेतून राजकारणाचा फड रंगला होता. अखेर निवडणूक संपली आणि निकालही सत्तापरिवर्तन करून गेला.
मात्र निवडणुकीच्या निमित्ताने तापलेले हे राजकीय वातावरण कायम असताना राजकीय कटुता बाजूला ठेवून नूतन संचालक आबाजी व डोंगळे यांनी आपटे यांची भेट घेऊन गोकुळमधील ३० वर्षांच्या मैत्रीला उजाळा दिला. यावेळी आपटे यांनी सभासदांनी तुम्हाला कौल दिला आहे, गोकुळ व्यवस्थित चालवा असे आवर्जून सांगितले. गप्पा गोष्टी वेळी सर्वांचेच डोळे भरून आले.