गोकुळ दूध संघ निवडणूकीची तयारी पूर्ण : निवडणूकीसाठी मतदानाचे साहित्य घेऊन कर्मचारी मतदानकेंद्राकडे रवाना
कोल्हापूर :
जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची ( गोकुळ ) निवडणूक होत आहे. उद्या जिल्ह्यातील 70 ठिकाणी मतदान होणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली असून कोल्हापुरातील रमनमळा येथील बहुउद्देशीय सभागृहातून विविध केंद्रांवर मतपेट्या घेऊन कर्मचारी रवाना झाले आहेत.
रविवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेमध्ये मतदान होणार आहे. जिल्ह्यातील एकूण 70 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रावर जवळपास 50 ते 55 मतदार मतदान करू शकतील, असे नियोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात एकूण 3 हजार 656 मतदार आहेत. त्यातील तीन मतदारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रत्यक्षात 3 हजार 653 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आतापर्यंत एकूण 40 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. त्या सर्वच मतदारांना शेवटच्या एक तासामध्ये मतदान करता येणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक मतदाराची मतदान केंद्राबाहेर तपासणी करण्यात येणार आहे.
मतदाराला कोरोनाची लक्षण आढळल्यास त्या मतदाराला शेवटच्या एक तासात मतदान करण्यास सांगण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली.