ज्यादा दर देणारा आणि दहा दिवसाला बिले देणारा गोकुळ राज्यातला एकमेव संघ : राजू शेट्टी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीला पाठींबा जाहीर
अशोक चराटी यांचाही सत्ताधारी गटालाच पाठिंबा
‘ अडचणीच्या काळातही गोकुळने सभासदांना दर दिला ही मोठीच बाब, गोकुळ चांगलंच चाललंय ‘ याचा आर्वजून केला उल्लेख
कोल्हापूर :
संपूर्ण राज्यात आम्ही दूध आंदोलनाच्या निमित्ताने फिरत असतो. अन्य ठिकाणी दूध दर हा फारच कमी. गोकुळने सगळ्यांच्या पेक्षा ज्यादा दर दिला आहे. सभासदांना ज्यादा दर देणारा आणि दर दहा दिवसाला बिले देणारा गोकुळ राज्यातला एकमेव संघ आहे, अशा शब्दात गोकुळच्या व्यवस्थापनाचे कौतुक करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना गोकुळ निवडणुकीत सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले.

कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी हा पाठिंबा जाहीर केला. यावेळी आमदार पी.एन.पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, ज्येष्ठ संचालक अरुण नरके, माजी आमदार संजयबाबा घाटगे, माजी खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते. प्रारंभी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींचे स्वागत ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी, तर अशोक चराटी यांचे स्वागत माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टीं आपली भूमिका मांडताना म्हणाले, अगदी कमीतकमी दूध उत्पादक असलेल्या उत्पादकालाही न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही कायम संघर्ष केला आहे. यापूर्वी दूध दरवाढीसाठी गोकुळ मध्ये अनेकवेळा आंदोलन केली आहेत. आणि त्या त्या वेळी दर मिळाला आहे. शेणामुतात राबणाऱ्या उत्पादकांचा हा संघ राहिला पाहिजे ही भूमिका कायम आहे. गोकुळ मल्टिस्टेट होणार नाही आणि चांगला दर मिळेल या दोन बाबींवर आश्वासन मिळाल्यानेच संघटनेच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करूनच पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये दूध व्यवसाय अडचणीत आला, दूध उत्पादक अडचणीत आला. दूध स्वीकारायला कोण तयार होईना. दुधाचे दर १४ रुपये पर्यंत खाली आले. अशा कठीण परिस्थितीत गोकुळने दूध तर स्वीकारलेच शिवाय दर १० दिवसाला उत्पादकाला दुधाचे बिल देऊन त्यांना आर्थिक स्थर्यही दिले. अनेकांना ही गोष्ट लहान वाटते, पण हे गोकुळचे वैशिष्ट्य आहे. गोकुळ चांगलंच चाललंय याची उल्लेख शेट्टी यांनी आवर्जून केला.
याप्रसंगी अशोक चराटी यांनी ,माजी आमदार महादेवराव महाडिक व आमदार पी.एन.पाटील हे आमचे जिल्ह्याचे नेते असल्याचे सूचक वक्त्यव्य केले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील, सावकार मादनाईक आदी उपस्थित होते.