कोल्हापूरच्या विकासासाठी बदल हवा : संभाजीराजे छत्रपती
कोल्हापूर :
पुरोगामी विचार जिवंत ठेवण्यासाठी शिव शाहूंचा समतेचा विचार दिल्लीत पोहोचवूया.देशातील दडपशाही मोडून काढण्याची गरज आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपल्याला पुढे जायचे आहे. कोल्हापूरच्या विकासासाठी बदल हवा, असे प्रतिपादन संभाजीराजे छत्रपती यांनी केले.
महाविकास व इंडिया आघाडीचे लोकसभा उमेदवार शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारार्थ कोळिंद्रे (ता.आजरा) येथे ते बोलत होते. कोळिंद्रे जिल्हा परिषद मतदार संघातील गावांचा प्रचार दौरा केला.
संभाजीराजे म्हणाले, लोकसभेची ही निवडणूक देशाला दिशा देणारी आहे. सध्याची दडपशाही लोकशाहीला घातक आहे. शाहू महाराज खासदार झाल्यानंतर जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी तालुक्यांमध्ये कार्यालय सुरू केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. नंदाताई बाभुळकर म्हणाल्या, जनतेनंच शाहू महाराजांना खासदार करण्याचे ठरविले आहे. सुसंस्कृत आणि वैचारिक वारसा लाभलेले आपले उमेदवार आहेत. सध्याचे सरकार शेतकरी विरोधी आहे. महागाईने जनता त्रस्त झाली आहे.” ना खाऊंगा …ना खाने दूंगा” असा नारा देणारे भाजपच भ्रष्टाचारात पुढे आहे. तरुणांना नोकरी नाही. उद्योगधंदे अडचणीत आल्याने बेरोजगारी वाढली आहे.
गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर, मुकुंदराव देसाई, आप्पी पाटील, रचनाताई होलम, रामराज कुपेकर, अभिषेक शिंपी, संपतराव देसाई, संतोष मास्तोळी, अशोक तरडेकर, संजय येसादे, रवी भाटले यांच्यासह महाविकास आघाडी जनता दलाचे, वंचित आघाडीचे स्थानिक पदाधिकारी , कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकट
प्रा.मंडलिक यांनी आम्हाला दगा दिला
गत लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार प्रा. संजय मंडलिक हे विजयी झाल्याशिवाय पायात चप्पल घालणार नाही,असा संकल्प करून साडेतीन महिने त्यांच्यासाठी उन्हातान्हातून वणवण फिरलो. अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी जीवाचे रान केले परंतु ऐनवेळी त्यांनी आम्हाला दगा फटका देऊन कोणत्याही प्रकारे विचारात न घेता शिंदे गटात प्रवेश केला. ज्यांच्यासाठी आम्ही अनवाणी फिरलो त्यांनी आमच्याशी केलेली ही प्रतारणा असून त्यांना या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊ.पण यावेळी श्रीराम नवमीचे औचित्य साधून महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांना निवडून आणण्याचा संकल्प शिवसैनिकांनी केला असून निश्चितच त्यांना निवडून आणू असा विश्वास शिवसेना ( उबाठा ) उपतालुकाप्रमुख संजय येसादे यांनी व्यक्त केला.
‐————-