जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे निर्देश
कोल्हापूर :
ज्येष्ठ तसेच व्याधीग्रस्त नागरिकांचे 100 टक्के लसीकरण होण्यासाठी सर्वप्रथम ग्रामसेवक, पोलीस पाटील, शिक्षक, आशा, कोतवाल यांना नोंदणीचे प्रशिक्षण द्या, लोकांचे प्रबोधन करणे, जास्तीत-जास्त नोंदणी करणे याबाबत गावनिहाय आराखडा तयार करा, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात तहसिलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी या सर्वांची व्हिडीओ कॉन्फरन्स घेण्यात आली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे, पोलीस उपअधिक्षक सुनिता नाशिककर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, वैद्यकीय रुग्णालयाचे अधिष्ठता एस. एस. मोरे, डॉ. फारुख देसाई उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, मृत्यूदर रोखण्यासाठी लसीकरण करुन घेणे ही महत्वाची जबाबदारी आहे. तालुक्यातील मोठ्या खासगी रुग्णालयांचे तालुका आरोग्य अधिकारी यांनी प्रस्ताव पाठवावेत. प्रत्येक गावातील ज्येष्ठ आणि व्याधीग्रस्त नागरिकांची यादी घ्या. गावनिहाय नोंदणी आणि लसीकरणाचे नियोजन करा त्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना गावे वाटून द्या, गावांमध्ये जनजागृती करा, नोंदणी करण्यासाठी शिक्षक, आशा सेविका यांची मदत घ्या.
पहिल्या टप्प्यात गावातील स्थानिक प्रतिनिधी, लोक प्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित नागरिक यांचे प्रथम लसीकरण करुन घ्या. जेणेकरुन त्यांचा अनुभव इतरांसाठी प्रोत्साहन ठरेल.
खासगी मध्ये ‘250 रुपयांचा’ शासकीयमध्ये ‘मोफत’चा फलक लावा,
प्रातांधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. निश्चितच 100 टक्के लसीकरण होण्यासाठी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना प्रोत्साहीत करुन नियोजनासाठी मदत करतील, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, खासगी रुग्णालयात दर्शनी भागात 250 रुपये ही लसीची किंमत असल्याचा फलक दर्शनी भागात लावावा. यापेक्षा जास्त पैसे घेतले जाणार नाहीत याची खबरदारी घ्या. शासकीय रुग्णालयात मोफत लस असा फलक दर्शनी भागात लावावा. याठिकाणी पैसे घेतले जाणार नाहीत तसेच कोणताही गैरप्रकार होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही ते म्हणाले.
ज्येष्ठ नागरिकांची सोय करा
प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांची शिक्षक, आशा सेविका यांच्या माध्यमातून नोंदणीकरणाचे नियोजन करा. नोंदणी झाल्यानंतरच प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी पाठवावे जेणेकरुन त्याठिकाणी गर्दी होणार नाही वा ज्येष्ठांना रांगेत उभे रहावे लागणार नाही. नोंदणी झाल्यानंतर लसीकरणाच्या केंद्रावर त्यांचे लसीकरण अल्पावधित होईल. त्याचबरोबर व्याधीग्रस्त व्यक्तींसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्याविषयी जनजागृती करावी, असेही जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चव्हाण म्हणाले, 100 टक्के लसीकरण होण्यासाठी दवंडी, व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून तसेच तरुण मंडळाच्या माध्यमातून गावागावात जनजागृती करा. ज्या अधिकारी, कर्मचारी यांचे लसीकरण राहीले असेल त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन प्रथम आपले लसीकरण करुन घ्यावे. लसीकरणाबाबत नियोजन करा.
महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनीही महापालिकेतर्फे करण्यात आलेले नियोजन व्हिसीत सहभागी होत सांगितले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळे यांनीही सूक्ष्म नियोजन करण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी कोविन ॲपवर नोंदणी कशी करायची याबाबत प्रात्यक्षिक देण्यात आले.
यावेळी प्रांताधिकारी वैभव नावाडकर, अमित माळी, डॉ. संपत खिलारी, विजया पांगारकर, डॉ. विकास खरात, रामहरी भोसले, महिला व बाल विकासचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, डॉ. उषादेवी कुंभार उपस्थित होते.
संपर्क अधिकारी (ग्रामीण क्षेत्र) – करवीर – प्रातांधिकारी वैभव नावाडकर, पन्हाळा – प्रातांधिकारी अमित माळी शाहूवाडी – उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, हातकणंगले- प्रातांधिकारी विकास खरात, शिरोळ – माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, कागल- प्रातांधिकारी रामहरी भोसले, आजरा- उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, गडहिंग्लज- प्रातांधिकारी विजया पांगारकर, चंदगड- कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, भूदरगड- डॉ. संपत खिलारी, गगनबावडा- जिल्हा समाज कल्याण अधिकारी दिपक घाटे, राधानगरी – उपविभागीय अधिकारी प्रसेनजीत प्रधान.
नागरी क्षेत्र – कोल्हापूर महानगरपालिका – अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, पन्हाळा नगरपरिषद -मुख्याधिकारी, मलकापूर नगरपालिका- मुख्याधिकारी, हातकणंगले नगरपंचायत- मुख्याधिकारी स्नेहलता कुंभार, हुपरी नगरपंचायत- मुख्याधिकारी स्नेहलता कुंभार, वडगाव नगरपालिका- मुख्याधिकारी, इचलकरंजी नगरपालिका – प्र. मुख्याधिकारी शरद पाटील, शिरोळ नगरपंचायत – मुख्याधिकारी, जयसिंगपूर नगरपालिका- मुख्याधिकारी, कुरुंदवाड नगरपरिषद – मुख्याधिकारी, कागल नगरपालिका- मुख्याधिकारी, मुरगूड नगरपालिका – मुख्याधिकारी, आजरा नगरपंचायत- मुख्याधिकारी, गडहिंग्लज नगरपालिका- मुख्याधिकारी, चंदगड नगरपंचायत – मुख्याधिकारी .