करवीर :
बालिंगा ता. करवीर येथे भर वस्तीत दोन गल्लीत राहत्या घरातील दारांना बाहेरून कड्या लावून चोरट्यांनी धाडसी चोरी केली. पाच घरे फोडली. चोरट्यांच्या हाती फारसा माल हाती लागला नाही.घटनेची नोंद करवीर पोलिसात झाली आहे. दरम्यान कड्या घालून दरोडा टाकल्याने नागरिकांच्यात घबराट पसरली आहे.

दारांना कड्या घालून दरोडा टाकल्याची पहिली घटना घडली आहे. यामुळे करवीर पोलिसांना मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
येथे हनुमान गल्ली व शाहू वसाहत आहे. रात्री दोनच्या सुमारास या वसाहतीत व गल्लीत मोठ्या प्रमाणात कुत्री भुंकत होतीत, अशी माहिती यावेळी नागरिकांनी दिली. ज्या घरात कोणी राहत नाही अशीच घरे हेरून चोरीचा प्रयत्न झाला.या दोन्ही गल्लीत राहत्या घरातील दारांना बाहेरून कड्या घालण्यात आल्या होत्या.हनुमान गल्ली येथील वासुदेव अनंत देशपांडे हे कुटुंब पुणे येथे राहण्यास गेले आहे. त्यांच्या घराला कुलूप होते. दरवाजाचे कुलूप तोडून, यांच्या घरातील एलईडी टीव्ही चोरीला गेला, आणि कपाट फोडून ५०० ग्रॅम चांदीचे दागिने,व देव पूजेचे साहित्य चोरीला गेले आहे,या घराच्या समोर असणारे मिलिंद घोरपडे यांचे घर आहे. हे कुटुंब कोल्हापुर येथे राहण्यास गेले आहे. त्यांच्या घराचे कुलूप तोडून, चोरट्यांनी घरातील तिजोरी फोडली, मात्र त्यांच्या हाती काहीही लागले नाही.
शाहू वसाहत येथील शिवाजी शंकर पाटील यांचे बंद घर चोरट्यांनी कुलूप तोडून फोडले. या ठिकाणी तिजोरी फोडली मात्र चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. त्यानंतर या घराशेजारी उत्तम कृष्णात लोहार यांचे बंद घर आहे.उत्तम लोहार यांचे कुटुंब फोडलेल्या घराशेजारीच राहते, यांच्या घराला बाहेरून कडी लावून बंद घराचे कुलूप तोडून,चोरट्यांनी आत प्रवेश केला व तिजोरी फोडली सुदैवाने तिजोरीत अन्य ठिकाणी दोन तोळ्याचे दागिने, लहान मुलांचे वाडे तोळे ठेवले होते ते चोरट्यांच्या हाती लागले नाही. शेजारीच सचिन श्रीकांत शिरगुप्पे कर यांचे बंद घर आहे, चोरट्यांनी कुलूप तोडून आत घरात प्रवेश केला व लाकडी कपाट फोडले मात्र या कपाटा तून चोरट्यांना काहीच सापडले नाही.
सकाळी नेहमीप्रमाणे चालण्यास व व्यायामासाठी नागरिक बाहेर येताना दरवाज्यांना बाहेरून कड्या असल्याचे लक्षात आले.सर्व नागरिक मागील दरवाज्यातून गल्लीत येऊन कड्या काढल्या. त्यानंतर गल्लीत बोभाटा झाला.पाहतात तर एका पाठोपाठ एक अशी पाच बंद घरे चोरट्यांनी फोडल्याचे लक्षात आले.या घटनेची माहिती पोलिसात दिली. त्यानंतर पोलिसांनी स्वान पथक घेऊन माग काढण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान दारांना कड्या घालून असे चोरीचे प्रयत्न शहरालगत होऊ लागल्याने नागरिकांच्या घबराट पसरली आहे. चोरट्यांना पोलिसांचा धाक नाही अशा प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहेत. यामुळे पोलिसांना चोरट्यांनी आव्हान निर्माण केले आहे.