ज्येष्ठ पत्रकार श्री सुधाकर काशीद यांच्या लेखणीतून…
कोल्हापूर :
पंचगंगा नदीच्या पूर्वेकडील घाटाचा कोपरा तीन महिन्यापूर्वी कोसळला आहे.कोसळलेले दगड आणि माती आपल्या कवेत घेऊन घाटाचा हा कोपरा हतबल अवस्थेत उभा आहे. पंचगंगा नदीच्या घाटाची ही पूर्वेकडची बाजू म्हणजेपंचगंगेच्या सौंदर्याचा एक सुंदरसा कोपरा. तो अनेक चित्रकारांनी आपल्या कुंचल्यातून साकारला. आता वरवर दिसणारा हा घाट तीस ते चाळीस वर्षांपूर्वी महापालिकेने बांधला आहे. पण मूळ घाट त्या खाली दडला आहे. योगायोगाने कोल्हापुरातील जुने छापाचित्रकार बी पी पाटील यांनी घाटाचे काढलेले मुळ छायाचित्र सौरभला मिळाले आहे.
या छायाचित्रात घाट किती रुंद आहे पहा. विशेष हे की आता पश्चिमे कडे जो शेवटचा घाट आहे, जेथे सकाळी खूप जण पोहतात. तो घाट या छायाचित्रात नाही. म्हणजे तो घाट बांधण्या पूर्वीचे हे छायाचित्र आहे. आता पश्चिमेकडील( ब्रम्हपुरी कडील) घाटाचा बुरजा सारखा कोपरा तीन महिने झाले कोसळला आहे.
घाट कोणी बांधायचा हा वादाचा मुद्दा झाला आहे. महापालिका व पुरातत्व विभागाने एका झटक्यात हा प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. पण घाट दुरुस्त केला म्हणून मताचा गठ्ठा मिळेल याची शक्यता नाही. कारण पंचगंगेवर कोणी मतदार रहात नाहीत. त्यामुळे घाटाची दुरुस्ती झाली नाही तरी इच्छुकांचे काही बिघडत नाही अशी परिस्थिती आहे. परिणामी घाटाचा हा कोपरा, कोसळलेले दगड व माती आपल्या कवेत घेऊन तीन महिने झाले हतबल होऊन उभा आहे. आता आपण कोल्हापूरकर सर्वांनी मिळून या पडलेल्या घाटासाठी काहीतरी करूया ?. ..