करवीर :
करवीर तालुक्यातील चाफोडी येथे रेणुका मातेचा भंडारा उत्सव व श्री मच्छिंद्रनाथ महाराज मिरवणूक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रेणुका भक्त श्रीमती शांताबाई महादेव सुर्वे यांच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमांना भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी सुमारे अडीचशे गरीब व गरजू महिलांना साडी वाटप करून सुर्वे कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
रेणुका मातेच्या भंडारा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी जागर कार्यक्रम झाला तर मंगळवारी रेणुका मातेचा भंडारा उत्सव पार पडला. दुपारी प्रसाद वाटप करण्यात आला. त्यानंतर रविवारी (दि. ९) मच्छिंद्रनाथ महाराज मिरवणूक सोहळ्यानिमित्त वाजतगाजत तुळशी नदीतून पाणी आणून पूजा करण्यात आली. नाथांचे फोटोपूजन करण्यात आले. रात्री प्रसाद वाटप करण्यात आले.
उत्सवानिमित्त गरजू व गरीब महिलांना साडी वाटप व पुरुषांना वस्त्रदान करण्यात आले. यावर्षी सुमारे अडीचशे महिलांना साडी वाटप करण्यात आल्या.
गेली ३९ वर्षे हा उत्सव सुर्वे कुटुंबीय मोठ्या भक्तीने चालवीत आहेत. धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने अन्नदान व वस्त्रदान करून सामाजिक बांधिलकी सुर्वे कुटुंब जोपासण्याचा प्रयत्न करीत आहे. १ मे रोजी चाफोडीतील रेणुकामाता मंदिराच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून हभप गोपाळ आण्णा वास्कर महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.